मुंबई : महान्यूज लाईव्ह
अन्वय नाईक आत्महत्त्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आजही निर्णय झालेला नाही. सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून गुरुवारी याबाबत निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामीचा आजचा मुक्कामही तळोजा तुरुंगातच असणार आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्त्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊनही अर्णव गोस्वामी यांना दिलासा मिळालेला नाही. उलट अलिबाग सत्र न्यायालयातून याप्रकरणी जामीन घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत गेली दोन दिवस अलिबाग न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीतही तारीख पे तारीख अशीच काहीशी स्थिती असल्यामुळे अर्णव यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
अलिबाग न्यायालयात दाखल असलेल्या जामीन अर्जाबाबत बुधवारी सरकार पक्षाची बाजू ऐकून घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जामीनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्यातरी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.











