पुणे, दि. १३ जुलै : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने मदतीची घोषणा केली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, सर्व जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील.
आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमी वारकऱ्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. शासन अपघातग्रस्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, भावार्थ देखणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला यापूर्वीच देण्यात आल्याचे सांगत, पंढरपूरकडे पायी निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी नमूद केले. तसेच वाहनचालकांनी पालखी मार्गावर अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.











