बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील आमराई परिसरात दोन गटांतील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला झाल्याची गंभीर घटना शुक्रवारी (१० जुलै) पहाटे घडली. या प्रकरणी सहा जणांसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली तसेच आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आमराई परिसरात दोन गटांमध्ये भांडण आणि गोंधळ सुरू असल्याची माहिती डायल ११२ आपत्कालीन सेवेद्वारे मिळाली. त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गिरीश गणपत नेवसे आणि तुषार शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी सार्वजनिक शांतता आणि कायदा- सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे, गणेश शंकर पाथरकर आणि त्यांच्या इतर साथीदारांनी पोलिसांच्या कायदेशीर आदेशांचे उल्लंघन करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच पोलिसांना धमकावत त्यांच्यावर बलप्रयोग केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात पोलीस शिपाई गिरीश नेवसे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११५(१), १२१(१), १३२, १९५(१), २२१, ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही तपासणी सुरू असून त्यांच्याविरुद्ध आवश्यक त्या प्रतिबंधक कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब संकलित करण्यात येत असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयात सक्षम दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलीसांवर झालेला हल्ला हा केवळ एका कर्मचाऱ्यावरचा नसून कायद्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेवरचा हल्ला आहे. कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.










