शिक्रापूर, दि. ३ : शिक्रापूर परिसरातील एका दुकानाचे शटर फोडून दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तिघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला आणि दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले १० इलेक्ट्रिक मोटार पंप संगनमताने चोरून नेले. तपासादरम्यान मुख्य आरोपी अजय हनुमंत जाधव याने साथीदार संतोष बालाजी लोहार आणि वैभव अशोक घुमरे यांच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. सणसवाडी येथील एल अँड टी फाट्याजवळ आरोपी असल्याची माहिती डायल ११२ पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून अजय हनुमंत जाधव (वय २५), संतोष बालाजी लोहार (वय २४) आणि वैभव अशोक घुमरे (वय २१) यांना २९ जून रोजी ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार आर. डी. मळेकर हे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार मळेकर, नितीन सुद्रीक तसेच पोलीस शिपाई नागेश वाघमारे, विकास बांगर, संतोष बाबर, ललित चक्रनारायण आणि कृष्णा बडे यांच्या पथकाने पार पाडली.










