पुणे : महान्यूज लाईव्ह
जगातील सर्वांत आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अनबाउंड ग्रॅव्हेल सायकल स्पर्धेत पुण्याचे ज्येष्ठ सायकलपटू सूरज विनय कुडतरकर (वय ५६) यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला आहे. अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील एम्पोरिया येथे झालेल्या या स्पर्धेच्या १०० मैल (सुमारे १७१ किलोमीटर) गटातील शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करणारे ते यंदाचे एकमेव भारतीय स्पर्धक ठरले आहेत.
ग्रॅव्हल सायकलिंग विश्वातील ‘अनबाउंड ग्रॅव्हेल’ ही स्पर्धा सहनशक्ती, मानसिक ताकद आणि तांत्रिक कौशल्य यांची खरी कसोटी मानली जाते. यंदा या स्पर्धेच्या २०व्या आवृत्तीत १०० मैल गटात तब्बल १,५८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सूरज कुडतरकर यांनी १०६.२ मैलांचे अंतर १० तास ३९ मिनिटे ५३ सेकंदांत पूर्ण करून फिनिश लाईन गाठली.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे खडीचे आणि उखडलेले रस्ते, मोठमोठे दगड, चिखलयुक्त मार्ग, तीव्र चढ-उतार, विस्तीर्ण पठारे तसेच वेगाने वाहणारे वारे आणि अचानक बदलणारे हवामान. अनेकदा मुसळधार पावसामुळे रस्ते चिखलमय होतात आणि सायकल चालविणे अशक्य झाल्याने स्पर्धकांना सायकल खांद्यावर घेऊन काही किलोमीटर चालावे लागते. अशा कठीण परिस्थितीत शर्यत पूर्ण करणे हेच मोठे यश मानले जाते.
कुडतरकर यांनी संपूर्ण शर्यतीत संयम आणि उत्कृष्ट नियोजनाचे दर्शन घडविले. अधिकृत निकालानुसार त्यांनी एकूण क्रमवारीत १,२०५वे स्थान, पुरुष गटात ९६४वे स्थान, तर ५० ते ५९ वर्षे वयोगटात ३७० स्पर्धकांपैकी २८७वे स्थान पटकाविले.
या यशाबद्दल बोलताना सूरज कुडतरकर म्हणाले, अनबाउंडसारख्या स्पर्धेसाठी केवळ उत्साह पुरेसा नसतो, तर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि काटेकोर नियोजन आवश्यक असते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील बिल्ड एक्सरसाईज क्लिनिकच्या मार्गदर्शनाखाली मी स्पर्धेची तयारी केली.
एंड्युरन्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ कंडिशनिंग, कोअर स्टॅबिलिटी, पोषण व्यवस्थापन आणि रिकव्हरी यावर विशेष भर देण्यात आला. माझे वय लक्षात घेऊन प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली, त्यामुळे ही कामगिरी शक्य झाली.” या यशामागे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील बिल्ड एक्सरसाईज क्लिनिकचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याबाबत प्रतिक्रिया देताना क्लिनिकचे प्रमुख डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, भारतामध्ये ग्रॅव्हल सायकलिंग अजूनही प्रारंभिक टप्प्यात आहे. अशा वेळी जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय सायकलपटूने यशस्वीरीत्या फिनिश करणे ही अभिमानाची बाब आहे. योग्य प्रशिक्षण, शिस्त, चिकाटी आणि सहनशक्तीच्या जोरावर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावरही आपली छाप पाडू शकतात, हे सूरज कुडतरकर यांच्या कामगिरीने सिद्ध केले आहे.
सूरज कुडतरकर यांच्या या यशामुळे भारतीय ग्रॅव्हल सायकलिंगला नवी प्रेरणा मिळाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची वाढती उपस्थिती अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.











