राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन सराईत आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने केलेले दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दौंड तालुक्यातील खोरवडी परिसरातील बाबीरनगर, आवडेवस्ती, आवाळेवस्ती आदी चार ठिकाणी तसेच श्रीगोंदा हद्दीत एका ठिकाणी सहा ते सात दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत नागरिकांना मारहाण केली. त्यानंतर सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल फोन आणि दुचाकी असा सुमारे ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलिसांचे विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गुन्ह्यांची कार्यपद्धती, आरोपींच्या हालचाली, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची सूत्रे हातात घेतली. घटनास्थळापासून सुमारे ५० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहमदनगर), विशाल हंबर्डिया काळे (वय २१, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड), किशोर रावण भोसले (वय १९, रा. बाबुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना अटक केली. तसेच एका विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले. आरोपी शेतात, माळरानावर व विविध ठिकाणी वास्तव्य करून पोलिसांना चकवा देत असल्याची माहिती तपासात समोर आली.
आरोपींकडून केलेल्या चौकशीत त्यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अनेक दरोडे, जबरी चोरी आणि घरफोड्यांची कबुली दिली. या टोळीने दौंड, बारामती, यवत, जुन्नर, माळेगाव आणि आळेफाटा परिसरात केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये ४ दरोडे, ६ जबरी चोरीचे गुन्हे आणि ५ घरफोड्या उघड झाल्या आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ८ गुन्ह्यांचीही उकल झाली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीतील आणखी काही साथीदारांचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांच्या विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोडेखोर टोळीचा मोठा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.











