*राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह*
महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी योद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम कायम लक्षवेधी ठरतो. इंग्रज सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असतानाच त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून १८५७ च्या उठावाच्या तब्बल २६ वर्षे आधी स्वातंत्र्याचा पहिला रणशिंग फुंकणारे महानायक म्हणजे राजे उमाजी नाईक.
*जन्म आणि बालपण*
राजे उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे झाला. वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई. कुटुंबात भाऊ अमृता व कृष्णा, तर बहिणी जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती. वयाच्या १० व्या वर्षीच ते नामांकित कुस्तीगीर म्हणून प्रसिद्ध होते. सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांनी नसरापूरच्या राममंदिरात त्यांचा गौरव केला होता. दांडपट्टा, कुर्हाडी, तीरकामठा, गोफण, भालाफेक, घोडेस्वारी, तलवारबाजी या सर्व कला त्यांनी वडिलांकडून अवगत केल्या होत्या.
*इंग्रजांविरुद्ध बंडाची ठिणगी*
शिवशाहीपासून पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी नाईक घराण्याकडे होती. मात्र १८०३ नंतर दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा पाल्य बनून रामोश्यांकडून किल्ल्याचे संरक्षण काढून घेतले. इंग्रजांनी रामोशी समाजाला गुन्हेगार ठरवले. वतने रद्द केली, शेती-उद्योगाचा आधार हिरावला. १८०४ मध्ये जांभुळवाडीवर हल्ला करून त्यांना हुसकावले. पोटासाठी लुटालूट करण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
ही परिस्थिती उमाजींना अस्वस्थ करीत होती. त्यांनी जातीबांधवांना एकत्र करून जागृती केली. खंडोबाला साक्षी ठेवून गेलेली वतने आणि स्वराज्य परत मिळवण्यासाठी बंडाचे निशाण हाती घेतले. सुरुवातीला ३०० वर सैन्य जमवून त्यांनी लढा उभारला.
*इंग्रजांना सळो की पळो करणारे १४ वर्ष*
१६ फेब्रुवारी १८३१ रोजी त्यांनी इंग्रजाविरुद्ध अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला – “लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात, त्यांचे खजिने लुटावेत, शेतसारा देऊ नये, इंग्रजांना कोणी मदत करू नये. १८२४ मध्ये कडेकोट बंदोबस्त असूनही भांबुर्ड्याची तिजोरी लुटली. मिरजेच्या पटवर्धनांना लुटले, १८२६ मध्ये पंढरपूर-पुणे मार्गावर सावकाराला लुटले, जेजुरी पोलीस चौकीवर हल्ला करून बंदुका पळवल्या.२१ डिसेंबर १८३० रोजी मांढरदेवी गडावर इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला गोफण आणि बंदुकीने घायाळ करून परत पाठवले.
उमाजी नाईक यांचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची ते काळजी घेत. एका शेतकऱ्याची गहाण जमीन सोडवून दिली, गरीब वधू-वरांना दागिने दिले, महिलांवर अन्याय झाल्यास भावासारखे धावून जात. त्यामुळे ते जनतेचे राजे बनले. त्यांचे सैन्य ५ हजारांपर्यंत पोहोचले. त्यांनी स्वतःचा दरबार, ध्वज, चौक्या स्थापन करून शिवरायांचे हुबेहूब अनुकरण करीत दुसरे स्वराज्य उभारले. भोगा, पांडू, येसाजी, सत्तू, कृष्णा, भुजबा, पांड्या हे त्यांचे शूर साथीदार होते.
*तुरुंगवास आणि लढ्याची धार*
इंग्रजांना त्रास दिल्याने १८१८ मध्ये त्यांना एक वर्ष तुरुंगवास झाला. तुरुंगातच ते लिहायला-वाचायला शिकले. सुटल्यानंतर त्यांचा लढा अधिक तीव्र झाला. पुरंदर मामलेदार इंग्रज सैन्यासह पोखर, कोडीतच्या डोंगरात त्यांचा शोध घेत असताना झालेल्या तुंबळ युद्धात इंग्रजांचा पराभव झाला. उमाजींनी पाच इंग्रज सैनिकांची डोकी कापून मामलेदाराकडे पाठवली होती. नोव्हेंबर १८२७ मध्ये त्यांनी ठणकावून सांगितले होते – “आज हे बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील.”
इंग्रज हादरले. त्यांनी समझोता करून १८२९ मध्ये १२० बिघे जमीन, नाईक पदवी आणि गुन्हे माफी दिली, पण स्वराज्याचे स्वप्न पाहणारे उमाजी शांत बसणारे नव्हते.
*फितुरी आणि बलिदान*
उमाजींना पकडण्यासाठी इंग्रजांनी १० हजार रुपये आणि ४०० बिघे जमिनीचे बक्षीस जाहीर केले. अखेर फितुरीने घात केला.एका कुलकर्ण्यानेही मदत केली.
अखेर १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उत्रोली गावी रात्री बेसावध असताना इंग्रजांनी उमाजी राजेंना पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीच्या काळ्या खोलीत ठेवण्यात आले. इंग्रज अधिकारी माँकिन टॉस याने त्यांची हकीकत लिहून ठेवली आहे.
न्यायाधीश जेम्स टेलर यांनी देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. *३ फेब्रुवारी १८३२* रोजी वयाच्या ४३ व्या वर्षी खडकमाळ आळीत मामलेदार कचेरीसमोर नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बाबू सोळसकर यांनाही फाशी दिली. दहशत बसावी म्हणून त्यांचा देह पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकत ठेवला होता.
इतिहासकारांनी त्यांना हवे ते स्थान दिले नसले तरी जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले महानायक म्हणून आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे स्थान अजूनही अबाधित आहे. त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे, त्यांच्या कार्यावर सखोल संशोधन व्हावे, त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, शासकीय जन्म दिन आणि बलीदान दिन सर्वत्र साजरा करावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.











