दौलतराव पिसाळ, वाई
वाई व भोर मार्गावरील मांढरदेव घाट रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने भाविक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मांढरदेव येथे जाण्यासाठी या दोन्ही घाटमार्गांचा वापर केला जातो. मात्र, अपूर्ण कामामुळे घाटातील काही भाग धोकादायक बनल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मागील वर्षी दोन्ही घाटांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, भोर घाटातील चेन क्रमांक 102/980 ते 105/450 या दरम्यान वन विभागाची परवानगी न मिळाल्याने सुमारे दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. परिणामी या भागातील रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहने चालविणे अत्यंत धोकादायक बनले असून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने समन्वय साधून प्रलंबित काम पूर्ण करावे, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून दिला जात असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.











