निलेश भोंग, इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर गुरुवारी नगरपरिषद कार्यालयासमोर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपर व धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःचा बचाव केल्याने मोठी दुर्घटना टळली.
या हल्ल्यावेळी अनिल पवार यांच्या मदतीसाठी धावून गेलेले वसीम शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नगरपरिषद परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख पटविणे आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याच्या दृष्टीने पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
भरदिवसा नगरपरिषद कार्यालयासमोर घडलेल्या या धाडसी हल्ल्यामुळे इंदापूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस लवकरच हल्लेखोरांचा माग काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











