दौंड : महान्युज लाईव्ह
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटबाव येथे 31 जुलै 2020 रोजी घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात बारामती अपर व जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार उर्फ मंगेश अरुण जाधव, (रा. सद्गुरू कॉलनी, वेणूनगर, वाकड रोड, ता. हवेली, जि. पुणे) याने 31 जुलै 2020 रोजी लोखंडी कोयता व लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केला. यात त्याची पत्नी मनिषा उर्फ हनिबाई उर्फ आशीबाई मंगेश जाधव आणि गुलचंद निकम (रा. भोर, जि. पुणे )यांचा निघृण खून झाला होता.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे प्रमोद पवार याने आपले नाव खोटे सांगितले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी कसोशीने तपास करून आरोपीविरुद्ध भक्कम व सबळ पुरावे गोळा केले. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
हा खटला पाच वर्षे चालला. गुरुवारी 2 जुलै 2026 रोजी बारामती अपर व जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी आठवी साक्षीदार असलेली बालाबाई जाधव या महिलेने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालामुळे चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा शेवट झाला असून, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबत न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी प्रमोद जाधव यास दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला जन्मठेप व पाच हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी शिक्षा अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील श्री. सुनील वसेकर यांनी खटला प्रभावीपणे चालवून यशस्वी युक्तिवाद केला.











