पिंपरी-चिंचवड, दि. १२ जुलै : मोशी येथील कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी रात्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी कामगारांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमींकडून दुर्घटनेचा थरारक घटनाक्रम जाणून घेतला तसेच डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
या भेटीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांनी मोशी दुर्घटनेला शासकीय आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण असल्याचे म्हटले आहे. शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ९ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमी कामगारांना योग्य व न्याय्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय, मोठ्या शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याच्या पुनर्वापराबाबत राज्याने ठोस व दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रत्येक शहरासाठी शास्त्रोक्त पद्धतीने कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी आणि त्यासाठी कठोर कालमर्यादा निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. शासनाने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये आणखी कुणाचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत, असे आवाहन करत सुप्रिया सुळे यांनी मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.











