ऑस्ट्रॉनॉमी प्रवासवर्णन – ४ : घनश्याम केळकर, बारामती
अंतराळातील अनेक शक्ती आपल्यावर नजर रोखून आहेत. पृथ्वीवासीय अंतराळाचा शोध घेत आपल्यापर्यंत येण्यापूर्वी आपण त्यांच्यावर ताबा मिळवावा अशी रणनीती पृथ्वीपासून लाखो करोडो योजने अंतरावर असलेल्या परग्रहावरील जीवांनी केव्हाचीच आखलेली आहे. आतापर्यंत त्यांच्या तबकड्या अमेरिकेवर फिरताना दिसत होत्या. पण भारतात एका नव्या शक्तीचा उदय झाल्याने त्यांनी नजर आता भारतावरून फिरते आहे.
अमेरिकेअगोदर भारतातील महाशक्तीच आपल्यापर्यंत पोचण्याची त्यांना भीती वाटते आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या तबकड्या सतत भारताच्या अवकाशात घिरट्या घालत आहेत. अशाच एका तबकडीकडून त्यांच्या ग्रहाला पाठविले गेलेले संदेश आम्हाला मिळतात. एक महिन्यापासून प्रत्येक आठवड्यात या तबकडीने केलेल्या प्रवासाचा हा वृत्तांत आम्ही वाचकांना सादर करत आहोत.
मोठमोठ्या मिडिया समुहाकडे नाहीत अशी लांब लांबची आणि खूपच लांबलांब सूत्रे आमच्याकडे आहेत. त्यांच्या माध्यमातूनच हा वृत्तांत आमच्या हाती लागतो. एक सच्चा बातमीदार म्हणून जीवानिशी जाण्याचा धोका पत्करून आम्ही तो आपल्यापुढे सादर करतो आहोत. या आठवड्यात पृथ्वीवर कब्जा करण्याच्या सगळ्य़ा योजनेचा तपशील कळविला गेला आहे.
वृत्तांत जसा आहे तसा…………
दिल्लीवरुन आता काश्मीरकडे प्रवास सुरु केला . काश्मीरहून पंजाब, तेथून राजस्थान, गुजरात मार्गे दक्षिणेकडे निघालो आहोत. काश्मीरमधील गोळीबाराचे आवाज आता खुपच कमी झाले आहेत. पर्यटकांचे आवाज आता जास्त ऐकू येतात. दिल्लीत मुक्कामी गृहस्थांना याचे श्रेय दिले जाते आहे आणि ते योग्यच आहे. यावेळी प्रवासाचा सविस्तर वृतांत पाठवित नाही तर पृथ्वीवर ताबा मिळविण्याच्या आपल्या योजनेमध्ये आतापर्यंत किती सफलता मिळाली त्याचा अहवाल पाठवत आहोत.
पृथ्वीवर ताबा मिळविणे – सविस्तर अहवाल पृथ्वीचा इतिहास
मानवी भाषेत या ग्रहाला पृथ्वी म्हणतात. पृथ्वी निर्माण झाली त्याला आता ५ कोटी वर्षे झाली ( वाचकहो, ही कालगणना आम्ही आपल्या सोयीसाठी दिलेली आहे. पृथ्वीबाहेर कालाची गणना बदलते. या अहवालात जी कालगणना दिलेली आहे, ती आपल्याला न समजणारी आहे.) पृथ्वी आता जशी हिरवीनिळी दिसते तशी दिसायला लागली, त्यालाही २ ते २.५ कोटी वर्षे झाली.
आपल्या पूर्वजांना तेव्हापासून या ग्रहाचे आकर्षण आहे. त्या काळात आपले पुर्वज या ग्रहावर रहात होते. परंतू येथील वातावरण बदलत गेले. ते आपल्याला राहण्यायोग्य राहिले नाही, त्यामुळे ते येथून निघून गेले. परंतू याच बदलत्या वातावरणात येथे झाडे वाढली, असंख्य प्रकारच्या जंतूंची निर्मिती झाली. पाण्यात राहणारे, आकाशात उडू शकणारे असे हे जंतू होते. सध्या या ग्रहावर ज्याचे वर्चस्व आहे तो मानव जंतूही निर्माण झाला.
पण आपल्या पुर्वजांनी दुसरीकडे आसरा शोधला. अधूनमधून ते येथे येत असत, परंतू येथे राहू शकत नसत. त्यांचे या ग्रहाकडे दुर्लक्ष होत गेले. पण या पृथ्वीवरील एका हालचालीने त्यांचे याकडे लक्ष वेधले. काही मानवी जंतू पृथ्वीभोवताली फिरत असलेल्या चंद्र या उपग्रहावर काही काळासाठी उतरले. हा आपल्या पुर्वजांसाठी धक्का होता. हा मानव जंतू असाच प्रगती करत गेला, तर आपल्यापर्यंत येऊ शकतो, असे लक्षात आल्याने तेव्हापासून या ग्रहावर पुन्हा ताबा मिळविण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
या ग्रहावर ताबा मिळवायचा असेल तर अशा जंतूंवर मात करावी लागेल, ते संघटीत आहेत. मधमाशा, मुंग्या आणि मानव असे या पृश्वीवरील काही संघटीत होऊ शकणारे जंतू आहेत. सध्या त्यातील मानवाचे पृथ्वीवर जास्त वर्चस्व आहे. त्यामुळे या मानवाला नष्ट करण्यासाठी सध्या आमचे प्रयत्न सुरु आहेत.
ही सगळी आकाशगंगा आमच्या ताब्यात आलेली आहे. मात्र पृथ्वी नावाच्या या ग्रहावर ताबा मिळविण्याचे आमचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. मेक्सिको नावाच्या देशात एक मृतदेह सापडला आहे. तो परग्रहावरील जीव असल्याचे संबंधित देशाच्या लोकांचे म्हणणे आहे. ते शरीर कित्येक पिढ्यापूर्वीच्या आपल्या पुर्वजाचे असण्याची शक्यता आहे. तेव्हापासून या ग्रहावर ताबा मिळविण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. या ग्रहावर सध्या सर्वात शक्तीशाली जंतू हा मानव आहे. हा मानव नष्ट झाला तर या ग्रहावर आपल्याला ताबा मिळू शकतो. मात्र मानव संपविताना पृथ्वीचे सर्व वातावरण टिकवले पाहिजे. यासाठी मानवाच्या हातूनच मानवाला संपविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मानवाचा नष्ट करण्यासाठीच्या योजना! मानवी मनात पिल्ले जन्माला घालण्याचा तिटकारा निर्माण करणे!
मानवी जंतूंच्या मनात पिल्ले जन्माला घालण्याचा तिटकारा निर्माण केला तर त्यांची लोकसंख्या कमी होईल. यासाठीचा पहिला प्रयोग सध्या भारतात वास्तव्यास असणाऱ्या पारशी धर्मीयांवर करण्यात आला. त्याला चांगले यश मिळाले. शंभर वर्षापूर्वी लाखांच्या घरात असलेले पारशी आता अवघ्या हजारात उरले आहेत. युरोप, आशियातील जपान, कोरिया, चीनसारख्या देशातील मानव जंतूवर सध्या हा प्रयोग सुरु आहे. त्यालाही यश येते आहे.
या ठिकाणी येथील स्त्रीपुरुष त्यांच्या पिल्लांना जन्म देण्यास तयार नाहीत. स्त्रीपुरुष या जोडीला जर दोन पिल्ले झाली तर मानवी लोकसंख्या स्थिर राहील. पण जर या जोडीने एकाच पिल्लाला जन्म दिला तर पुढच्या ४० ते ५० वर्षात लोकसंख्या निम्म्यावर येणार. त्यामुळे जे मानवीजंतू आपल्याला आव्हान देऊ शकतील अशा बुद्धीमान मानवी जंतूंच्या मनात नवीन पिल्ले जन्माला घालण्याबाबत घृणा निर्माण करणारी रासायनीक प्रक्रिया सुरु करण्यात आम्ही य़शस्वी झालो आहोत. चीनसारख्या देशाची लोकसंख्या आता कमी होते आहे. पुढील पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या स्थिर होईल, आणि त्यानंतर तीदेखील कमी होऊ लागेल.
सध्या आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशात लोकसंख्या वाढते आहे. पण या ठिकाणचे मानवी जंतू इतरांपेक्षा कमी प्रगत आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्याला धोका नाही. युरोप आणि जपानमधील लोकसंख्या वेगाने कमी होते आहे. तेथे तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या वाढते आहे. मात्र या प्रयोग संपूर्ण यशस्वी होण्यासाठी २०० हून जास्त वर्षे लागतील. तेवढा वेळ थांबणे धोक्याचे असल्याने इतरही मार्गांचा वापर करत आहे.
मानवी जंतूंच्या मनात व्देष आणि रागाची भावना निर्माण करणे.
मानवी जंतूंच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया घडवून राग आणि द्वेषाची भावना मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी प्रयत्न नियमितपणे सुरु आहेत. त्याच्या परिणामी भाऊ भावाचा शत्रु बनलेला आहे. यामुळे देशादेशांमध्ये व्देषाची भावना तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून अणुबॉम्बचे इतके साठे आज तयार आहेत, की त्यातील थोडासा भाग जरी वापरला गेला तरी सगळे मानवी जंतू नष्ट होऊन जातील.
दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या जंतूंनी मानवी जंतूच्या शरीरात प्रवेश केला. पण हा हल्ला या जंतूंनी परतवून लावला आहे. त्यामुळे कोणत्याही बाह्य जंतूच्या हल्ल्यामुळे हे जंतू नष्ट होणार नाहीत. त्यांच्या मन नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड निर्माण केल्यानेच ते नष्ट होतील याची आमची आता खात्री पटली आहे.
राष्ट्रप्रमुखांच्या मनावर ताबा मिळवून त्यांना अणुबॉम्बचा वापर करण्यास प्रवृत्त करणे.
याबाबत सर्व तयारी पुर्ण झाली आहे. या ग्रहावरील दोन देश आताही एकमेकांशी भांडत आहेत. त्यातील एका रशिया नावाच्या देशाकडे अणुबॉम्बचे मोठे साठे आहेत. हा देश कोणत्याही क्षणी या अणुबॉम्बचा वापर करु शकतो. असे झाल्यावर लगेचच विरुद्ध बाजुचे देशही आपल्याकडील अणुबॉम्बचा वापर करतील. भारत आणि पाकिस्तान, दोन्ही कोरिया, इस्त्रायल आणि अरब देशातही अशाच प्रकारच्या युद्धाची शक्यता केव्हाही आहे. या सगळ्यांकडे अणुबॉम्ब आहेत.
या देशातील लोकांनी या अणुबॉम्बचा वापर करावा यासाठी या देशांच्या प्रमुखांच्या शरीरातील रासायनीक प्रक्रिया वेगाने सुरु होण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून हे राष्ट्रप्रमुख कोणत्याही क्षणी अणुबॉम्बचा वापर करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय संबंधित देशाचे प्रमुख घेत असतात. सध्या या ग्रहावरील सर्व देशांच्या प्रमुखांच्या शरीरावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यांच्या शरीरातील राग, भय आणि व्देष र्निमाण करणाऱ्या रसायनांची वाढ व्हावी यासाठी विशेष तरंग पाठवले जात आहेत.
हा प्रयोग नुकताच सुरु केलेला आहे, पण त्याला यश येताना दिसते आहे. रशिया, इराण, चीन, उत्तर कोरिया, इस्त्रायल यासारख्या देशांच्या प्रमुखांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलते आहे. यापैकी कोणीही अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय घेऊ शकते. अमेरिकेचे यापूर्वीचे प्रमुख पुर्णपणे आपल्या ताब्यात आले होते. परंतू ते सत्तेतून बाहेर गेल्याने आपले मोठे नुकसान झाले. भारताच्या प्रमुखांवरही या तरंगाचा परिणाम अधुनमधून दिसतो. परधर्मियांबाबतचा व्देष आणि अहंकाराचे रासायनिक तरंग त्यांच्या मनावर प्रभाव पाडताना दिसतात. ते आणखी काही वर्षे या देशाचे प्रमुख राहिले तर आपल्याला फायद्याचे आहे. अणुबॉम्बचा साठा तयार आहे, पण आतापर्यंत फक्त दोन अणुबॉम्बच वापरले गेले. आता हजारो अणुबॉम्ब तयार आहेत. यांचा वापर झाला पाहिजे यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. यात कोणत्याही क्षणी यश मिळू शकते.
वातावरणातील बदलाने मानवी जीवन नष्ट होणे
सध्या वातावरणातील बदल, अवेळी येणारा पाऊस किंवा दुष्काळ यामुळे हे मानवी जंतू फारच अस्वस्थ आहेत. या बदलांमुळे मानव जंतू नष्ट होतील असे त्यांना वाटते. या जंतू निर्माण करत असलेल्या कचऱ्यामुळे आणि वायूंच्या उर्त्सजनामुळे हा धोका निर्माण होतो आहे. पण या प्रकाराने मानवी जंतूचे अस्तित्व संपण्यासाठी खुपच वेळ लागेल. तेवढ्या वेळात या ग्रहावरील पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे तितका वेळ थांबून राहणे शक्य नाही. त्यातून पृथ्वीवरील वातावरणात जर बदल झाला तर ते आपल्याच नाही तर सगळ्या आकाशगंगेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याअगोदर पृथ्वीवर ताबा मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.
या योजनेव्दारे कोणत्याही क्षणी या ग्रहावर आपला ताबा होऊ शकतो. या ग्रहाच्या सर्व भागात आपल्या तबकड्या आता कार्यरत आहेत. या ग्रहावरील मानवच नाही तर प्रत्येक जीवाने घेतलेल्या प्रत्येक श्वासाची आपल्याकडे नोंद होते आहे. या ग्रहांवरील जीवांपेक्षा आपण खुप पुढे गेलेलो आहेत. काही क्षणाच्या आता या पृथ्वीवरील सर्व जीव नष्ट करून आपण या ग्रहाचा ताबा घेऊ शकतो. पण अशा हल्ल्याचे मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. कदाचित अशा हल्ल्यात पृथ्वी आपली कक्षा सोडू शकते. यातून सुर्यमाला आणि आकाशगंगा अनियंत्रित होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला मर्यादा पाळाव्या लागतील. त्यामुळे सध्या आम्ही सर्व तयारी करून वाट पाहत आहोत.
आपला आज्ञाधारक, ऑस्टॉनॉट
(विशेष सूचना – वाचकहो, ही ब्रेकींग न्यूज आहे. पण यापेक्षाही ब्रेकींग न्यूज पुढच्या आठवड्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ पृथ्वीवरून बाहेर जाणारे संदेश आम्हाला मिळत होते, पण आता बाहेरून पृथ्वीवर येणारे संदेशही मिळविण्यास आमच्या यंत्रणेला यश मिळालेले आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात परग्रहावरून पृथ्वीवर येणारा संदेश आम्ही आपल्याला सादर करू. याअगोदरची ऑस्टॉनॉमी प्रवासवर्णने वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर जावे. https://mahanews.live/47422/ , https://mahanews.live/47313/ आणि https://mahanews.live/47602/











