पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात संशयित विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या मालिकेने महाराष्ट्र हादरला आहे. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातील तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असताना या मृत्यूंमागे भेसळयुक्त दारूचे घातक जाळे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. योगेश वानखेडे याला कथित भेसळयुक्त, अवैध दारू पुरवठा प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
एका मागोमाग एक मृत्यू होत असताना अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही हा संतप्त प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. मृत व्यक्तींना अचानक उलट्या, तीव्र अस्वस्थता, पोटदुखी आणि प्रकृती खालावल्याची लक्षणे दिसल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अनेकांना जीव गमवावा लागला. काही जण अजूनही गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत्यूंचा सुळसुळाट आणि प्रशासन झोपेत?
घटनेनंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने तपास सुरू केला असला तरी नागरिकांचा रोष प्रशासनावरच आहे. परिसरात अवैध गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या मग हे जाळे इतके दिवस सुरू कसे राहिले? कारवाईसाठी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जात होती का असा सवाल उपस्थित होत आहे.
दारू माफियांचे जाळे उघड होणार?
या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून एका प्रमुख पुरवठादाराला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. तपास यंत्रणा आता दारू तयार करणारे, पुरवठा करणारे आणि विक्री करणारे यांची संपूर्ण साखळी शोधत आहेत. या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
विषारी दारू की काही वेगळे?
दापोडी-फुगेवाडी परिसरातील काही मृत्यूंचा संबंध थेट विषारी दारूशी असल्याचे अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही. पोलिसांनी शवविच्छेदन आणि रासायनिक विश्लेषण अहवालांची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र एकाच परिसरात अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने संशयाचे बोट भेसळयुक्त दारूकडेच वळले आहे.
मेथेनॉलचा ‘सायलेंट किलर’ संशय
तज्ज्ञांच्या मते भेसळयुक्त दारूमध्ये मेथेनॉल मिसळले गेल्यास ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. अशा दारूमुळे अंधत्व, मेंदूवरील परिणाम, मूत्रपिंड निकामी होणे आणि मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे जप्त नमुन्यांची कसून तपासणी सुरू आहे. १८ जणांचा जीव गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली पण या मृत्यूंसाठी जबाबदार कोण? अवैध दारू विक्रेते, त्यांना संरक्षण देणारे हात की दुर्लक्ष करणारी यंत्रणा? हा प्रश्न आता पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो संपूर्ण राज्याच्या प्रशासन व्यवस्थेसमोर उभा ठाकला आहे.











