राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : शेतीसाठी केलेली उपसाबंदी उठविणे, प्रति टन उसाला ७५०० रुपये भाव देणे, साखरेला ७० ते ८० रुपये किलो दराने विक्री करणे आणि दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करणे या मागण्यांसाठी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने पुकारलेल्या साखर वाहतूक बंद आंदोलनाला साखर वाहतूक वाहन मालक आणि चालकांनी पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर साखर पोती भरण्यासाठी आलेली वाहने मागील दोन दिवसांपासून जागेवर उभी असल्याचे चित्र कारखाना स्थळावर पाहायला मिळत आहे. शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. १३) दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मंगळवारी कारखान्यातून बाहेर पडणारी साखर वाहतूक करणारी वाहने अडवून त्यांना गुलाबपुष्प देऊन साखर वाहतूक बंद करण्याची विनंती संघटने केली होती.
त्यानुसार कालपासून भीमा पाटस कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू असुन कारखान्याच्या आवारात साखर वाहतूक करणारी वाहने मोठ्या संख्येने जागेवर उभी आहेत. एकीकडे सरकारने आणि कारखानदाराने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्याशिवाय ऊस गाळप आणि साखर वाहतूक सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने घेतला आहे.
शेतकऱ्यांची उसाला ७५०० रुपये देण्याची आग्रही मागणी आहे. तर साखर ७० ते ८० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात यावी. जर असा दर देता येत नसेल तर २५ किलोमीटरचे असलेली दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेची आहे. सरकारने आणि कारखानदाराने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा नांदखिले यांनी दिला होता.
त्यानुसार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दौंडसह पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर आंदोलन सुरू असून गोडाऊनमधून साखर वाहतूक बंद केली आहे. दौंड तालुक्यातील सहकारी आणि सध्या भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेल्या निराणी शुगर्स लि. या कारखान्यातूनही साखर वाहतूक ठप्प झाली असल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसांपासून कारखान्याच्या आवारात आणि अष्टविनायक रस्त्यालगत मोठ्या संख्येने साखर वाहतूक करणारी वाहने जागेवर उभी आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर साखर कारखान्यांच्या साखर वाहतूक करणाऱ्या वाहन मालक आणि चालकांनी शेतकऱ्यांच्या संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदखिले यांनी केले आहे.











