छत्रपती संभाजीनगर : नऊ महिने ज्या जीवाला गर्भात वाढवले, ज्याच्या पहिल्या रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी आई-वडिलांचे कान आतुरले होते, त्याच निष्पाप जीवाच्या मृतदेहाला साधा स्पर्श करण्याचेही जन्मदात्यांनी नाकारले. कारण काय? तर म्हणे ‘नवरात्र’ सुरू आहे आणि विटाळ-अंधश्रद्धेचे पाश गळ्याभोवती घट्ट आवळले आहेत! नवरात्रीत देवीच्या रूपाची पूजा करणाऱ्या समाजात एका निष्पाप नवजात बाळाच्या मृतदेहाला परक्यासारखे वाऱ्यावर सोडून देणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली असून, तिने संपूर्ण मानवतेला सुन्न केले आहे.
आनंदाच्या उंबरठ्यावर काळाचा घाला
मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले एक जोडपे कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास होते. घरी नवीन पाहुणा येणार म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदात होते. शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या मातेने सोमवारी रात्री एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु, हा आनंद काही क्षणांचाच ठरला. प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे अवघ्या एका दिवसाच्या त्या चिमुकल्याचा श्वास थांबला आणि जन्माची चाहूल थेट मृत्यूच्या शांततेत विलीन झाली.
सोवळ्या-ओवळ्यापुढे नात्यांचा गळा घोटला!
बाळाच्या जाण्याने डोंगर कोसळणे स्वाभाविक होते; मात्र त्यानंतर जे घडले ते कोणत्याही संवेदनशील मनाचा थरकाप उडवणारे होते. नवरात्रीचा उत्सव सुरू असल्याने, कसल्या तरी अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धेच्या भयापोटी आई-वडिलांनी आपल्याच पोटच्या मृत गोळ्याला हात लावणेही टाळले. ज्या हातांनी शेवटच्या क्षणी त्या चिमुरड्याला छातीशी कवटाळून अखेरचा निरोप द्यायला हवा होता, ते हात सोवळ्याच्या भीतीने आखडले. जन्मदाता बाप संपूर्ण अंत्यविधीदरम्यान लांब उभा राहून तमाशा पाहिल्यासारखा तटस्थ राहिला. दफनविधी उरकल्यानंतर वरून नावापुरते थोडेसे दूध शिंपडून तो निघून गेला. देवतेच्या पूजेचे अवडंबर माजवणारे हे वर्तन पोटच्या रक्तापेक्षा अंधश्रद्धेला मोठे मानणारे होते.
स्मशानभूमीतील ‘देवदूतांनी’ जपली माणुसकी
जन्मदात्यांनी नाकारलेल्या त्या अभागी जिवासाठी शेवटी स्मशानभूमीत काम करणारे देवराज गायकवाड आणि रामेश्वर साबळे हे देवदूत बनून पुढे आले. रोज मृत्यूचे तांडव आणि जळणाऱ्या चिता पाहणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतूनही या निर्दयी वागण्याने अश्रू वाहू लागले. त्यांनी स्वतः त्या चिमुकल्याला अत्यंत मायेने कुशीत घेतले, पोटच्या पोराप्रमाणे त्याला निरोप दिला आणि पूर्ण सन्मानाने त्याचा अंत्यविधी पार पाडला. रक्ताची नाती जेव्हा दगडासारखी थंड पडली, तेव्हा स्मशानातल्या या हातांनी माणुसकीचा ओलावा जिवंत ठेवला.
धर्माच्या नावाखाली विकृती कधी थांबणार?
नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून, घट बसवून आणि देवीची आरती गाऊन नक्की कोणती भक्ती साध्य होणार आहे, जर त्याच उत्सवाच्या नावाखाली स्वतःच्या मृत बाळाला स्पर्श करणे पाप वाटत असेल? देव दगडात शोधणाऱ्या या दांभिक मानसिकतेला स्मशानातील त्या दोन कर्मचाऱ्यांनी चपराक लगावली आहे. रितीरिवाजांच्या आणि अंधश्रद्धेच्या बेड्यांनी जर मातेचे वात्सल्य आणि पित्याचे कर्तव्यच मारून टाकले असेल, तर अशा श्रद्धेला श्रद्धा म्हणावे की जिवंत मनाचे मढं? हा सवाल आज समाजाच्या विवेकबुद्धीला विचारला जात आहे.











