घनश्याम केळकर : ऑस्ट्रॉनॉमी प्रवासवर्णन – २
भारतदेशावर लक्ष ठेऊन असलेल्या परग्रहावरून आलेल्या तबकडीने आपल्या ग्रहाला पाठविलेला आठवड्याचा वृत्तांत आमच्या हाती प्रत्येक आठवड्याला येत असतो. हाच वृत्तांत आपल्या वाचकांसाठी सादर करतो आहोत… जसा आहे तसा…..
दिल्लीतील व्टेंटी व्टेंटीची हवा शांत झाली, तसे आम्ही पुन्हा एकदा दक्षिणेकडे निघालो. वाटेत मध्यप्रांतात सध्या मोठी धामधूम सुरु आहे. येथे मध्यप्रांताचा पंचवार्षिक लोकोत्सव लवकरच होणार आहे, त्यामुळे दिल्लीवरून अनेकजण सारखे येथे येत आहेत. या पंचवार्षिक लोकोस्तवाबाबत अधिक माहिती घेतली असता यातील मुख्य कार्यक्रम हा एकाच दिवशी असतो असे कळाले. मात्र त्या अगोदर दहा पंधरा दिवस मोठी धामधूम चालते.
मुख्य कार्यक्रमाच्या आधीचा दिवस , विषेशत: रात्र फार महत्वाची असते असे जाणकार सांगतात. मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सगळे लोक आपापल्या गावात किंवा शहरात एका ठरलेल्या ठिकाणी जातात. तिथे एक यंत्र ठेवलेले असते. त्यावरचे बटन प्रत्येकाने दाबायचे असते. हा सगळा काय प्रकार असतो याची माहिती घेत आहे, पण बदल घडवायचा का नाही, यासाठी हा सगळा कार्यक्रम असतो अशी माहिती मिळालेली आहे.
या सगळ्या लोकोत्सवात मदिरापान होते, लक्ष्मी दर्शनही होते असेही ऐकीवात आहे. या सगळ्यातून खरोखर बदल होतो का? याबाबत अनेक शंकाकुशंका लोकांकडून व्यक्त होतात. मात्र एक बदल नक्की होतो, तो म्हणजे नुकतीच वयात आलेली तरुण पोर मदिरापान करायला शिकतात, असे येथील जाणकार सांगताना आपल्या रेकॉर्डरने टिपलेले आहे. मध्य प्रांतासोबतच राजस्थान आणि छत्तीसगढ नामे प्रांतातही हा लोकोत्सव लवकरच सुरु होणार आहे.
या भारतदेशी सतत हे लोकोस्तव सुरु असतात, कुठे एखाद्या गावाचा, कुठे त्यापेक्षा मोठ्या परिसराचा, केव्हा राज्याचा तर कधी सगळ्या देशाचा हा लोकोस्तव असतो. दिल्लीत मुक्कामाला असलेल्या गृहस्थांनी आता एकाच दिवशी सगळे लोकोस्तव करावेत असा प्रस्ताव आणला आहे. त्याबद्दल लोकांची कुजबूज आपल्याकडे रेकॉर्ड झालेली आहे.
यानंतर आम्ही महाराष्ट्र प्रांतावर येऊन स्थिरावलो. महाराष्ट्र प्रांती सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे पुढील काही काळ येथेच थांबावे लागेल असे वाटते आहे. सध्या या प्रांती खंजिरांची गर्दी झालेली आहे. साधारण अडीच तीन वर्षापूर्वीपर्यंत येथे एकाच खंजिराची चर्चा नेहमी होत असे. पण आता एवढे खंजीर झाले आहेत की, प्रत्येकजण आपआपल्या पाठी सांभाळून असतो. पण जेवढे खंजिर आता उघड झाले आहेत, त्यापेक्षा जास्त अजूनही लपवलेले आहेत आणि तेदेखील लवकरच बाहेर पडतील अशी चर्चा आहे.
त्यामुळे पाठीवरच्या बुलेटप्रुफ जाकीटांची मागणी सध्या महाराष्ट्र प्रांतातून प्रचंड वाढलेली आहे. स्वर्गात असलेली एक विभुती सध्या सारखी हळहळत असते, असे आपल्या स्वर्गावर लक्ष ठेवून असलेल्या अवकाशस्थानाच्या अहवालातून कळले आहे. महाराष्ट्र प्रांतीच्या प्रत्येक लहानमोठ्या गावात या विभूतीचे पुतळे दिसून येतात. समोर येऊन छातीवर घाव घालणारा एकही मर्द आपल्या स्वराज्यात उरला नाही का? या विचाराने ही विभूती सध्या फारच अस्वस्थ असते.
दुसरीकडे जो धोबी पक्षी या प्रांती हिवाळ्यात येतो, तो यावर्षी आताच आला आहे. फ्लेमिंगो पक्षी ज्यांना उथळ पाणी गरजेचे असते, तेदेखील हजारो योजनेचा प्रवास करुन वेळेआधीच येथे आलेले असल्याचे निरीक्षण या प्रांतीचे पक्षीतज्ञ नोंदवत आहेत. याचा अर्थ आता पाऊसकाळ संपला असा समजायचा काय? या ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या आपल्या अभ्यासिकांकडून याबाबत काही कळविण्यात आलेले आहे का?
मात्र जर पाऊसकाळ संपला असेल, तर पुढील काही काळ या प्रांतीच्या नागरिकांसाठी फारच कठीण असेल. येथून हजारो योजने दूरवर असलेल्या लिबिया नामक प्रांती प्रचंड पाऊस आणि वादळ आले. तेथील दोन धरणे फूटून एक अख्खे शहर वाहून गेले. तेथून जवळच्या एका प्रांतात भुकंपाचा मोठा धक्का बसला आहे. इथे मात्र या प्रांतीच्या नागरिकांच्या डोक्यावर पाऊसच नसल्याने काळजीचे ढग दाटून आले आहेत.
या देशी एकच व्यवसाय सगळ्यात फायद्याचा मानला जातो, तो म्हणजे राजकारण. सुकाळ असो वा दुष्काळ, या व्यवसायाला नेहमीच बरकत असते. येथील लाखो लोक तास न तास या व्यवसायाची नुसती चर्चा करत असतात. मात्र अशी चर्चा करणारे कधीच फायद्यात जात नाहीत. जे खरोखर हा व्यवसाय करतात, ते मात्र कधीच तोट्यात जात नाही. असो.
महाराष्ट्र प्रांत, मराठवाडा उपप्रांती प्रांताचे सर्व प्रधान एकत्र बैठकीसाठी जमले होते. नेहमी या बैठकी मुंबई नगरीत होतात, यावेळी या उपप्रांतीतील एका प्रमुख नगरात झाल्या. मराठवाडा प्रांताचे काय भले करता येईल यासाठी ही बैठक होती असे म्हणतात, पण चर्चा मात्र मुख्य आणि उप कुठे राहिले यावर रंगली. राऊत आले का? याच्या हेडींग झाल्या.
मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. या उपप्रांती नेहमीच पाणी कमी पडते. शेतकरी आपला जीव देण्यास प्रवृत्त होतो. याबाबत गांभिर्य कोणालाही दिसले नाही. ना कुठल्या प्रधानमंडळाला, ना विरोधी मंडळींना, ना जमलेल्या पत्रकार मंडळींना. खुद्द मराठवाड्यातील प्रजेलाही यात आता फारसा रस उरलेला दिसत नाही.
या निमित्ताने कुठे कुठे वाहनांची गर्दी होईल आणि आपला खोळंबा होईल याचीच चर्चा शहरातील लोक करत असलेले आपल्या रेकॉर्डरने टिपलेले आहे.
याप्रमाणे या आठवड्याचा संक्षिप्त अहवाल आहे, येत्या काही दिवसात दिल्ली शहरी मोठी सभा भरणार आहे. दिल्लीत मुक्कामी गृहस्थांनीच अचानक ही सभा बोलावली आहे. त्यामुळे आपल्या आदेशानुसार आता दिल्लीच्या दिशेने प्रवास सूरु केला आहे.











