राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथे सुरू असलेल्या अवैध खडी क्रशर व मुरूम उत्खननाची दौंड तहसीलदारांकडे तक्रार केल्याच्या रागातून तक्रारदार शेतकरी संदीप दत्तात्रय साळुंखे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर तिघांनी पीव्हीसी पाईप व दगडाने मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हिंगणीगाडा येथे घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगणीगाडा येथील गट नं.१४९ मध्ये रजनीकांत खराडे व रामदास साहेबराव खराडे यांच्या शेतात अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याबाबत संदीप साळुंखे यांनी दौंड तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली होती.
त्यानुसार दि. २६ मे २०२६ रोजी पाटस मंडलाधिकारी संगीता खराटे यांनी पंचनाम्यासाठी साळुंखे यांना गट नं. २२२ मध्ये बोलावले होते. त्यानुसार संदीप साळुंखे हे वडील व भावासह घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथे मंडलाधिकारी खराटे, कोतवाल लोंढे, तलाठी आगम तसेच हर्षद रजनीकांत खराडे, रामदास साहेबराव खराडे हे उपस्थित होते.
फिर्यादीनुसार हर्षद खराडे याने साळुंखे यांना पाहताच “तू खाली येऊ नको, तुझे कुटुंब संपवून टाकीन” अशी धमकी दिली. “तक्रार अर्ज मागे घे, तुझ्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला” असे म्हणत त्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. झटापटीत साळुंखे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी गहाळ झाली.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साळुंखे यांच्या वडिलांना व भावालाही हर्षद खराडे व रामदास खराडे यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व “येथून निघून जा” अशी धमकी दिली.
शेतात ही घटना घडल्यानंतर साळुंखे कुटुंब घरी परतले असता संतोष खराडे व हर्षद खराडे हे सांळुखे यांच्या घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करून संदीप साळुंखे यांच्या आईला हाताने मारहाण करून ढकलून दिले. त्यात त्यांच्या ब्लाऊजची बटणे तुटली. आरोपींनी पीव्हीसी पाईप व दगडाने मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले.
संदीप साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात हर्षद रजनीकांत खराडे, रामदास साहेबराव खराडे व संतोष रावसाहेब खराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार नुतनकुमार जाधव करीत आहेत. दरम्यान, अवैध उत्खननाविरोधात आवाज उठवणाऱ्यांवरच हल्ले होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











