मुंबई : महान्यूज लाईव्ह
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रांच्या बातमीदारांना पुरस्कार देण्यासाठी उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. १९ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला. एकंदरीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता कालबाह्य झाली असल्याचे मत व्यक्त केले गेल्याने, पत्रकार पुरस्कार समिती रद्दचा आदेश काढताना आता ही योजनाच रद्द करण्याचा सरकारचा संकेत दिसून येत आहे.
सन २००८ मध्ये तत्कालीन शासन निर्णयानुसार तंटामुक्त गाव मोहिमेची प्रभावी प्रसिद्धी करणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर पुरस्कार देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. यासाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता समिती गठित करण्यात आली होती.
मात्र, शासनाने जारी केलेल्या नव्या निर्णयात नमूद केल्यानुसार तंटामुक्त गाव मोहीम कालबाह्य झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये लोकसहभाग, पारदर्शकता आणि परिणामकारक प्रशासन यावर भर देण्यात येत असल्याने या समितीची आवश्यकता उरलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याआधी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीनेही तंटामुक्त गाव योजनेच्या प्रसिद्धीसाठी गठित समिती रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार गृह विभागाने ११ एप्रिल २००८ रोजीचा शासन निर्णय अखेर रद्द केला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून उपसचिव यमुना जाधव यांच्या स्वाक्षरीने तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दरम्यान शासनाच्या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत असून ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष व राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील म्हणाले की, तंटामुक्त गाव मोहिम पूर्णपणे बंद केल्यास ग्रामीण भागातील सामोपचार संस्कृती कमकुवत होऊन तंटे, गुन्हे व न्यायालयीन भार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुधारित स्वरूपात योजना अधिक प्रभावीपणे राबविणे हे अधिक हिताचे ठरू शकते. तंटामुक्त गाव मोहिम ही केवळ वाद निवारण योजना नसून ग्रामीण सामाजिक स्थैर्य टिकविण्याचे माध्यम आहे. योग्य सुधारणा करून तिचे बळकटीकरण करणे हे गाव, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या तिन्हींसाठी हिताचे ठरू शकते.











