दौलतराव पिसाळ, वाई
वाई तालुक्यातील कवठे गावातील श्रीमती नर्मदा बाबुराव लोखंडे (वय ८५) यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे त्यांचे निधनानंतरही समाजोपयोगी कार्य कायम राहिले असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नर्मदा लोखंडे या अनेक वर्षांपासून आपल्या भावाकडे, माजी सैनिक किसन लोखंडे यांच्या घरी कवठे येथे राहत होत्या. वृद्धापकाळ असूनही त्या शेतीची कामे उत्साहाने करत असत. मात्र नुकतेच त्यांचे निधन झाले. जिवंतपणी त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा अनेकदा आपल्या भाचा विजय लोखंडे व भाऊ किसन लोखंडे यांच्याकडे व्यक्त केली होती.
देशसेवेचा वारसा जपणारे माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार केला. दुःख बाजूला ठेवत त्यांनी तातडीने कवठे येथील डॉ. उत्तम डेरे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. डेरे यांनी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. काटकर व डॉ. राजमाने यांच्याशी समन्वय साधत तत्काळ हालचाली सुरू केल्या. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने कवठे येथे येऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
कवठे गावात नेत्रदान, देहदान आणि योगासनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात डॉ. उत्तम डेरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत गावातील सहा जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे.
“क्रांतिकारकांच्या कवठे गावासाठी ही नेत्रदान चळवळ अभिमानास्पद आहे,” असे मत डॉ. डेरे यांनी व्यक्त केले.
नर्मदा लोखंडे यांच्या भाच्यांनी सतीश व विजय लोखंडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आमची आत्या कोणाच्या तरी डोळ्यांतून हे सुंदर जग पुन्हा पाहत राहील, हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. लोखंडे परिवाराच्या या संवेदनशील आणि समाजाभिमुख निर्णयाचे कवठे परिसरातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.











