बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे महानगरपालिकेत 23 गावे समाविष्ट झाली ही झाली ब्रेकिंग न्यूज! पण या बातमी पलीकडची बातमी अशी आहे की, या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण राजकारणातले दादा आहोत हे सिद्ध केले..! भाजपाचे भलेभले नेते कोणत्याही परिस्थितीत तेवीस गावे समाविष्ट होऊ नयेत, म्हणून आटोकाट प्रयत्न करत होते त्यांना तर धोबीपछाड दिलीच, शिवाय पुणे महानगर पालिकेला मुंबई महानगरपालिका पेक्षा मोठ्ठं बनवलं.. येणारी निवडणूक राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडी साठी सोपी देखील बनवली..!
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष अजित दादांना लक्ष्य करत असला; तरी अजित दादांचे ‘लक्ष’ मात्र पुण्याच्या आगामी निवडणुकीकडेच होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांना बोलावून पुण्याच्या विकास कामासंदर्भात मंत्रालयात चर्चा केली. त्यावेळी पुण्याच्या महापौरांना मात्र या बैठकीचे आमंत्रण नव्हते. तेव्हाच पडद्यामागच्या हालचाली अधिक वेगाने सुरू होत्या. मागील निवडणुकीत भाजपने पुण्यात बाजी मारली. मात्र आता महाविकास आघाडीच्या सत्तेत ही २३ गावे कमाल करणार हे अजितदादांना चांगलेच ठाऊक आहे आणि हे केवळ त्यांनाच नव्हे तर भाजप ला देखील हे चांगलेच ठाऊक आहे.
त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला हा 23 गावांचा समावेश करण्याचा विषय, आता देखील मंजूर होऊ नये यासाठी पुण्यातील भाजपचे राज्यस्तरीय नेतृत्व देखील आटोकाट प्रयत्न करत होते. याकरता अगदी राज्यपालांपासून केंद्रीय पातळीपर्यंत बराच प्रयत्न करून झाला. मात्र अजितदादा काही बधले नाहीत.
पुणे महानगरपालिकेमध्ये आता ही बाहेरील तेवीस गावे समाविष्ट झाल्याने या गावांचा विकास तर साधला जाईलच, शिवाय पुण्याचे क्षेत्रफळ देखील मुंबईच्या महानगरपालिकेच्या हद्दीत पेक्षा अधिक मोठे झाले आहे. एरवीदेखील मुंबईनंतर पुण्याच्याच महापालिकेला महत्व असते. परंतु आता हे महत्त्व आणखीनच वाढणार असून राजकारणात देखील राज्याच्या पातळीवर पुणे महानगरपालिकेचे वजन अधिक मोठे होणार आहे.