बारामती : महान्यूज लाईव्ह
भाजपच्या आजच्या मेरा अंगण मेरा रणांगण या आंदोलनावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चौफेर टिका केली. आधी म्हणायचं ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आणि आता महाराष्ट्र बचावचे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं. अरे किती हिणवणार? अशा शब्दांत त्यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला राज्यकारभारात अपयश आल्याचा मुद्दा समोर घेऊन आज भाजपने राज्यभर कार्यकर्त्यांसमवेत मेरा आंगण, मेरा रणांगण हे आंदोलन केले. या आंदोलनातून भाजपने राज्य सरकारवर टिका केली. या आंदोलनापूर्वी व आंदोलनानंतर आज ट्विटरवर रोहित पवार यांनी भाजपवर टिका केली. त्यांनी यात नमूद केले आहे की, रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कोरोना योद्धांचा भाजप आंदोलनाच्या नावाने अपमान करीत आहे. मात्र राज्याचा एवढाच कळवळा असेल तर संकटात तरी एकदिलाने काम करून महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिले पाहिजे.
रोहित पवार यांनी आज एकामागोमाग एक ट्विट करीत भाजपच्या नेत्यांना सुनावले. आजचे भाजपचे आंदोलन हे मास्क वापरण्याचा व अंतर ठेवण्याचा नियम वगळता सगळं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेच वाटल्याचा टोला पवार यांनी लगावला आहे. आज राज्याला अशा नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे. राज्यातील लोकांचा आणि कोरोना वॉरियर्सचा भाजपने अपमान करू नये असे पवार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. राजकारण न करण्याचं अनेकदा आवाहन करुनही तुम्ही ते टाळूच शकत नाही का? असा सवाल पवार यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये केला असून एकतर लोकांच्या हक्कासाठी आणि कोणत्याही उत्स्फूर्त आंदोलनासाठी अशा लिखित मार्गदर्शनाची गरज नसते. पण तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे कपडे, रंग, मीडिया, घोषणा, अंतर असं सगळं कसं कार्यकर्त्यांना लिहून दिलं याचं खूप आश्चर्य वाटत असल्याचे रोहित यांनी नमूद केले आहे. रोहित पवार यांच्या या टिकेला भाजप आता कसा प्रत्युत्तर देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.











