महान्य़ूज लाईव्ह रिपोर्ट
आज एकीकडे दिल्लीतील वातावरण तापलेले असतानाच राज्यातही नाशिक, धुळ्यातून आलेल्या शेतकरी मोर्चाने व त्यानंतरच्या राज्यपाल न भेटल्याने शेतकऱ्यांनी फाडलेल्या निवेदनावरून रंगलेल्या शेरेबाजीने राज्यातही वातावरण तापले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंगना राणावतला लगेच भेटणारे राज्यपाल नेमके मोर्चा येणार म्हणून भेटत नाहीत, असा राज्यपाल कधीच पाहिला नव्हता अशी टिका केली. या टिकेनंतर राज्यपाल भवनने लागलीच शेतकरी नेत्यांना राज्यपाल भेटणार नसल्याचे पत्र प्रसिध्द केले.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी चारशे किलोमीटर चालत येऊन आझाद मैदानात ठिय्या मांडला. आज शेतकरी राज्यपालांना भेटणार होते. त्यातच आझाद मैदानावर राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी, कॉंग्रेस नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला थेट पाठिंबा देऊन खुद्द शरद पवार, कॉग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने या आंदोलनावर भाजपने राजकीय असल्याची टिका केली. मात्र मागील तीन महिन्याच्या काळात राज्यपाल कसे वागले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याने राज्यपालांनी मुद्दाम शेतकऱ्यांना भेटायचे नाही, म्हणूनच गोव्याचा प्लॅन केला अशी टिका शेतकरी नेत्यांनी केली. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल एका अभिनेत्रीला भेटण्यासाठी एका क्षणात वेळ देतात, मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा राज्यपाल मी आजपर्यंत पाहिला नाही अशी टिका केली. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
दरम्यान ही टिका होताच राज्यपाल भवनातून भारतीय सनदी अधिकारी व राज्यपालांच्या प्रधान सचिवांनी शेतकरी नेत्यांना राजभवनातून दिलेले पत्र प्रसिध्दीमाध्यमांना पाठवले. यामध्ये राज्यपाल या दिवशी म्हणजे २२ जानेवारीपासून महाराष्ट्रात नसणार आहेत, ते तुम्हाला भेटणार नसल्याचा खेद वाटत असल्याचे त्यांनी म्हटल्याचे हे पत्र शेतकरी नेत्यांना आधीच दिले होते असे राजभवनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान मुद्दा काहीही असला तरी आज सकाळपासूनच राज्यातील वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या, तसेच राष्ट्रीय वृत्तवाहिन्या सकाळपासूनच हे आंदोलन राजकीय असल्याचे, विशिष्ठ गटाशी संबंधित असल्याचा शोध लावून टिका करीत होते, त्यात संध्याकाळी भाजप नेत्यांनीही भर घातली. मात्र यातून राज्याच्या ग्रामीण भागात राज्यपालांविरोधात सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली.











