पुणे : महान्यूज लाईव्ह
एका व्यावसायिक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्त्येप्रकरणी तुरुंगात गेलेल्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपालांना चिंता वाटणे साहजिक आहे. परंतु ज्यांच्या घरातील दोन व्यक्तींना आत्महत्या करावी लागली, त्यांच्याबद्दल सहानुभती दाखवली असती तर बरं वाटलं असतं असं परखड मत व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरून भाजप नेत्यांनी जोरदार आगपाखड केली आहे. त्यातच केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील भाजप नेत्यांनीही यावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यानच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनीही या प्रकरणात उडी घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली.
आज पुण्यात पत्रकारांनी अर्णव गोस्वामीच्या अटकेविषयी राज्यपालांनी चिंता व्यक्त केल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार यांनी आपल्या शैलीत राज्यपालांना टोला लगावला आहे. राज्याचे प्रमुख म्हणून अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल चिंता वाटणे साहजिक आहे. परंतु ज्या घरातील दोन व्यक्तींनी आत्महत्या केली, त्यांच्याबद्दल राज्यपालांनी सहानुभूती दाखवली असती तर योग्य वाटलं असतं असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.











