इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इतरत्र कोरोनाची स्थिती निवळत असताना इंदापूर तालुक्यातील रूईमध्ये मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यातच येथील देशात प्रसिद्ध असलेली बाबीर यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. या परिस्थितीत इंदापूर तालुक्यात हॉटस्पॉट पाहत असलेल्या रुई गावांमध्ये माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आरोग्य मोहीम हाती घेतली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती असताना इंदापूर तालुक्यातील रुई येथे मात्र अद्याप पहिल्याच लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे.रुई येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली असून, ही परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रविण माने यांनी गावात भेट देऊन तेथील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रुई ग्रामस्थांशी संवाद साधत कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता, सतर्कता बाळगून आपली कोरोना चाचणी करून घेण्याविषयी माने यांनी आवाहन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माने यांनी डॉक्टर, आरोग्य सेविका, शिक्षक, आशाताई, यांच्यामार्फत गावाचे सर्वेक्षण करून घेण्यासाठीही उपाययोजना हाती घेतल्या असून, रुई ग्रामस्थांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी ५ हजार मास्क व रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळ्या वितरणाची मोहीम हाती घेतली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारी पारंपरिक व प्रसिद्ध देवस्थान बाबीर बुवा यांचीही यात्रा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बाबीर बुवांचेही दर्शन घरूनच घेण्याचे आवाहन माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रुई गावातील या आढावा भेटीच्या वेळी यशवंत कचरे, अजित पाटील, पद्माकर लावंड, अर्जुन पाटील, आकाश कांबळे, सर्जेराव मारकड, बबन मारकड, अंकुश लावंड, अॅड.अमरसिंह मारकड, संजय भगत, प्रविण डोंबाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील गावडे,विस्तार अधिकारी दिलीप जगताप , डॉ मनोजकुमार ढोले, प्रशासक श्री. शेख, ग्रामसेवक भिवाजी काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.











