आजच्या दिवशी शिवशंभु काळात काय घडलं?
शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
३० ऑक्टोबर इ.स.१६७७
ऐन पावसाळ्यातही छत्रपती शिवरायांची कर्नाटक मोहिम चालू होती. जुलै १६७७ च्या सुमारास छत्रपती शिवराय तिरूमलवाडीतून वृद्धाचलम् या मार्गाने पोटोनोव्हा या ठिकाणी आले. ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्काटवर महाराजांनी प्रभुत्व संपादन केले. पावसाळा संपल्यावर म्हणजे २९ -३०-३१ ऑक्टोबर १६७७ रोजी आरणी, होसकोट, शीरे, बाळापूर इत्यादी पश्चिम-दक्षिण जोडणारी स्थळे ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ ला कर्नाटक मोहिमेची सांगता केली.
३० ऑक्टोबर इ.स.१६८४
छ.संभाजी, शिकंदर आदिलशाह आणि अबुल हसन कुतुबशहा यांत एकजूट होईल असा संशय औरंगजेबास आला म्हणून त्याने आदिलशाहीवर ऑक्टोबर च्या शेवटी १६८४ मध्ये स्वारी केली…
छ. संभाजीराजे-मोगल संघर्ष
प्रामुख्याने मराठी राज्य बुडवावे तसेच आदिलशाही व कुत्बशाही पादाकांत करावी अशा निश्चयाने आणि बंडखोरी करून छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयास आलेल्या आपल्या अकबर या मुलाचा सूड घ्यावा या उद्देशाने औरंगजेब दक्षिण हिंदुस्थानात औरंगाबादेस आला (१६८२). तिथे त्याला आदिलशाही व कुत्बशाहीचे अनेक नामवंत सरदार जाऊन भेटले. मोगलांनी मराठयांचा पाडाव करण्यासाठी आदिलशाहाला सैन्याच्या खर्चासाठी नऊ लाख रूपये दिले परंतु मराठयांचे राज्य जिंकण्यास विजापूरकरांचा फारसा उपयोग होत नाही, हे लक्षात येताच त्याने शिकंदर आदिलशाहकडे एप्रिल १६८४ मध्ये फर्माने पाठविली.
त्यात प्रमुख अट, ‘संभाजीची मित्रता व सख्य बाह्यातकारी व अंतर्यामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजींचा निर्मूळ फडशा पाडण्याकरिता विचार करणे ’ ही होती. पण मराठयांविरूद्धच्या मोहिमेत मोगलांना सर्व आघाडयांवर अपयश येत होते. संभाजी, शिकंदर आदिलशाह आणि अबुल हसन कुत्बशहा यांत एकजूट होईल, असा संशय औरंगजेबास आला, म्हणून त्याने आदिलशाहीवर ऑक्टोबरच्या शेवटी १६८४ मध्ये स्वारी केली. या चढाईचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेतील तीन सत्ताधीश एकत्र आले. संभाजीराजे, आदिलशाह आणि कुत्बशहा यांचा गट तयार होऊन या त्रिकूटाने मोगलांशी सामना देण्याची तयारी केली.
३० ऑक्टोबर इ.स.१६८७
राजा फक्त पराक्रमी असून चालत नाही तर त्याला रयते विषयी प्रेम, आपुलकीही असावी लागते. शिवछत्रपतींचा हा वारसा त्यांचे पुत्र शंभुराजेही चालवत होते. स्वराज्य चारी बाजूंनी शत्रूंनी वेढले असतानाही शंभुराजेंचे रयतेकडे दुर्लक्ष होत नव्हते. जंजिरेकर सिद्दी आणि मुघल महाराजांच्या मुलखातील कुलाबा जिल्ह्यात लूटमार करत असत. अश्याच प्रकारची लूटमार त्यांनी १६८५ मध्ये चेऊल प्रांतात केली होती. या लुटीमुळे तिथली रयत आपली गावे सोडून परागंदा झाली होती.
त्यामुळे तिथल्या देशमुखांनी सुभेदार रायाजी सदक प्रभूला सांगितले की, मुलुख ओसाड आहे, रयत पुन्हा येऊन वसाहत करण्यास तयार आहे, पण त्यांना सवलतीच्या हव्या आहेत. रयतेच्या अनेक अडचणी होत्या पण सुभेदार रायाजीने आपण पंतप्रधानाचा कौल आणून देतो असे सांगून शेतकरी व व्यापाऱ्यांना पुन्हा वसाहती स्थापून आपला व्यवसाय करण्यास सांगितले. परागंदा झालेल्या रयतेच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या गाऱ्हाण्यासंबंधी ज्या सवलती देण्यात आल्या होत्या त्या दरबाराकडून मान्य करण्यात आल्या. या सगळ्या कलमांचा कौलनामा सादर करण्यात येऊन तो मान्यही करण्यात आला.
संकलन : राहुल बोरसे पाटील, अधिक माहिती साठी संपर्क - राजदादा तपसे, 9145806202 (आम्हीच ते वेडे, ज्यांना आस इतिहासाची)
⛳⛳⛳⛳⛳????⛳⛳⛳⛳⛳











