महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
उसाच्या ज्यूस पासून बनणाऱ्या इथेनॉल साठी सरकारने तीन रुपये 17 पैसे प्रति लिटर भाव वाढले असून इथेनॉलचा खरेदी दर आता 59.48 रूपयांवरून 62.65 रुपयांवर पोहोचला आहे.
यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन असून साखर कारखाने ब्राझील पॅटर्ननुसार इथेनॉल कडे वळाले आहेत. त्यामुळे यावर्षी साखरे बरोबरच इथेनॉलचे उत्पादन वाढणार असून, केंद्र सरकारने इंधनाची गरज लक्षात घेत इथेनॉलचा दरामध्ये पाच ते आठ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी बहुतांश उत्पादन कारखाने साखरेऐवजी इथेनॉल असाही पर्याय अवलंबण्याची शक्यता आहे.
काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये उसाच्या रसापासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉल ची खरेदी किंमत 62 रुपये 65 पैसे प्रति लिटर करण्यात आली आहे. तर बी हेवी मोलॅसिस पासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलची किंमत 54 रुपये 48 पैसे प्रतिलिटर वरून 57 रुपये 61 पैसे प्रति लिटर करण्यात आली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति लिटर 3 रुपये 13 पैसे आहे.
सी हेवी मोलॅसिस पासून बनणाऱ्या इथेनॉलची किंमत 43 रुपये 75 पैसे प्रतिलिटर वरून 45 रुपये 69 पैसे प्रतिलिटर करण्यात आली आहे. सी हेवी मोलॅसिस पासून बनणाऱ्या इथेनॉलची दरवाढ ही मागील वर्षीच्या तुलनेत एक रुपया 94 पैसे प्रति लिटर एवढी आहे.
इथेनॉल च्या खरेदी दरात झालेली ही वाढ पाच ते आठ टक्क्यांच्या दरम्यान असली, तरीदेखील सध्याच्या या संकटाच्या काळात साखर कारखान्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. त्याचे कारण असे की, सध्या साखरेचे दर किमान विक्री किमतीपेक्षा खाली दराने मागणी केली जात आहे आणि साखरेला उठाव नाही. अशा परिस्थितीत साखरेप्रमाणे इथेनॉल उत्पादन झाले, तर साखर उत्पादन पर्यायाने कमी होऊन साखरेला मागणी वाढेल आणि साखरेचे दरही योग्य समपातळीत राहतील.











