महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी खाजगी दवाखान्यांकडून कोरोनाग्रस्तांची होणारी आर्थिक लूट उजेडात आणल्यानंतर बारामतीत देखील प्रशासनाने परीक्षकांमार्फत बिले तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत चार खाजगी दवाखान्याकडून 36 लाख रुपयांची ज्यादा बिले आकारल्याचे उघड झाले आहे.
दौंड तालुक्यात मयुरेश्वर दवाखान्यावरती प्रशासनाने कारवाई केल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या खासगी दवाखान्याबाबत प्रशासनाने भूमिका घेतली. बारामती देखील बिले तपासण्याची मोहीम सुरू असून, तक्रारी आलेल्या दवाखान्यांची बिले तपासल्यानंतर चार खाजगी दवाखान्यांमध्ये ज्यादाची बिले आकारल्याचे प्रशासनाकडून निश्चित केले आहे. हे पैसे परत देण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले असून पैसे परत न केल्यास रुग्णालयांवर कारवाई होणार आहे.
अर्थात कमी-अधिक प्रमाणात बहुतेक कोविड दवाखान्यांमध्ये रुग्णांकडून अधिकची बिले आकारली गेली आहेत. कोरोनाच्या काळात डायलेसिसवर असलेल्या रुग्णांसाठी पहिले डायलिसिस 20 हजार रुपयापर्यंत आकारले गेले, अतिदक्षता विभागाचे भाडे देखील पंधरा हजार रुपये प्रतीदिनापर्यंत आकारले गेले आहे, अर्थात त्या जोडीला इंदापूरचा विचार करता बारामती तालुक्यात खाजगी दवाखान्यांनी तत्परतेने कोरोना रुग्णांना सेवा दिली हे देखील तेवढेच महत्त्वाचे होते.
रुग्णांचे नातेवाईक राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे सांगून पैसे न देताच रुग्णांचे मृतदेह घेऊन गेले आणि प्रशासनाने देखील तातडीने देण्याची सूचना केली, परंतु त्या दवाखान्यांना पैसे अद्याप मिळालेले नाहीत, संकटाच्या काळात रुग्ण व नातेवाईकांची हतबलता लक्षात घेऊन अधिकचे पैसे उकळणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र ती कारवाई करण्याबरोबरच करण्याबरोबरच दवाखान्याची बुडवलेले पैसे देखील परत मिळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांची आवश्यकता आहे.











