महान्यूज : आजची गझल
तू डोळ्यांचे ऐक मागणे, मला पहा
ठेव बाजुला सर्व कारणे , मला पहा
……………………………………….
रूप तुझे मी डोळ्यांमध्ये साठवले
नको आरसा बघू साजणे, मला पहा
……………………………………….
कशी जराशा पराभवाने खचली तू
काय राहते सर्व हारणे, मला पहा
……………………………………….
कशास इतका बाळगायचा मुलाहिजा ?
सोड जगाची भीड़ राखणे, मला पहा
……………………………………….
विशाल धरती, उदार अंबर, दहा दिशा
या सर्वांचे एक सांगणे, मला पहा
……………………………………….
गझलकार – रूपेश देशमुख, पुलगाव
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड











