इंदापूर: महान्यूज लाईव्ह
लग्न होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली, मात्र ती चूल आणि मुलाच्या पलीकडे पोचलीच नव्हती.. इतरांप्रमाणेच गृहिणी हाच शिक्का तिच्यावरही होता. मात्र आयुष्यात चढउतार येत असतात.. पतीच्या एका आजाराने तिच्या घरातील सारी गणितेच बदलली.. नववीपर्यंत जेमतेम शिक्षण झालेल्या सणसर येथील कल्पना धोत्रे यांनी पतीच्या आजारातून स्वतःला सावरून घराला आधार देण्यासाठी पदर खोचला आणि ना केवळ महिला सक्षमीकरण साधले..तर आपल्याबरोबर आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व घर बदलू पाहणाऱ्या शेकडो महिलांचीही ती आधार बनली. तिने बनवलेल्या वस्तू पुण्यापासून मंत्रालयापर्यंत व मुंबई पासून न्यूझीलंडपर्यंत पोचल्या.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता
सणसर येथील कल्पना भिमराव धोत्रे या महिलेची कहाणी इतर महिलांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांनी त्यांच्या शारदा महिला संघातून केलेल्या अर्थसहाय्यामुळे कल्पना धोत्रे यांनी मयुरेश्वर नावाने पर्स बनविण्याचे युनिट सुरू केले, त्याचे उदघाटन सौ. पवार यांनी केले आणि कल्पना यांच्या या प्रवासाला आणखीच उजाळा मिळाला. सौ. पवार यांनी देखील हा पत्र्याच्या शेडमधील महिलांचा प्रवास मोठ्या कारखान्यापर्यंत जावा अशा शुभेच्छा दिल्याने या महिलांना हत्तीचे बळ आले आहे.
कल्पना धोत्रे यांची कहाणी खूपच कष्टाची व तितकीच प्रेरणादायी आहे. दोन-तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कल्पना यांचे पती स्वादुपिंडाच्या विकाराने त्रासले. अवजड कामेच थांबल्याने त्यांची कामे थांबली. तीन मोठी मुले सांभाळून घर चालवायचा प्रश्न पुढे आला. मुले शिकत असल्याने मग काय करायचे हा प्रश्न पुढे आला, तेव्हाच कल्पना यांना भटक्या विमुक्तांच्या आर्थिक व सामाजिक समृध्दीसाठी झटणाऱ्या निर्माण संस्थेने आयुष्य बदलण्याची एक संधी निर्माण केली आणि कल्पना यांनी त्या संधीचे सोने करायचे ठरवले. या निर्माण संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध घरातील सजावटींच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण कल्पना यांनी घेतले. त्यात स्वतःचे कौशल्य ओतले आणि एका वेगळ्या व्यवसायाला आयाम दिला.
त्यांनी घरीच कापडी पर्स, महिलांच्या ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी तयार करण्यास सुरवात केली. बोलका स्वभाव असल्याने हातोहात वस्तू विक्री होऊ लागली. निर्माण संस्थेनेही पाठबळ दिले. वेगवेगळ्या प्रदर्शनातून या वस्तू विकू लागल्या आणि अगदी त्या न्यूझीलंडपर्यंत पोचल्या. गावाच्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या छोट्या घरातील महिलेच्या वस्तूंना परदेशातूनही मागणी येऊ लागल्याने अनेकांचे लक्ष इकडे वेधले गेले.
याच दरम्यान महिला सबलीकरणाचा अध्याय रचत असलेल्या शारदानगरच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी कल्पना यांच्यातील कौशल्य हेरले आणि त्यांना सुनंदावहिनींनी मग मोठे पाठबळ दिले. अनेक महिलांमध्ये उर्जा पेरण्यासाठी मग कल्पना धोत्रे यांची भरारी सुरू राहीली. त्यांनी राज्यभरात निर्माण व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्फत शेकडो महिलांना प्रशिक्षण दिले. आता त्यांनी गावातील महिलांना बरोबर घेऊन गावातच युनिट सुरू केले आहे.
कल्पना धोत्रे म्हणतात, मी फक्त माझे घर सावरले नाही, तर आपले कौशल्य इतरांनाही देण्याचा प्रयत्न केला, यातून माझे काहीच नुकसान झाले नाही, याउलट या वस्तूंची मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. सुनंदावहिनींनीही पाठबळ दिल्याने आता नक्कीच आम्ही मोठी भरारी घेऊ.
सुनंदा पवार, विश्वस्त अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती – कोरोनाने खूप काही शिकवले. महिलांनी या काळातही स्वस्थ न बसता काम केले, तर हा कोरोनाचा काळ देखील आपल्याला नवीन संधी निर्माण करून देऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. सणसरमधील महिलांनी कल्पना धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगले काम करावे व एक दिवस पत्र्याच्या शेडमधील हे युनिट कारखान्यात रुपांतरीत करावे. शारदा महिला संघ नेहमीच त्यांच्या पाठीशी कायम उभा असेल.`











