14 हजार फळ वृक्षांची भेट
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रेनेट व्हिलेज या क्लबच्या माध्यमातून वरकुटे खुर्द व परिसरातील 1000 कुटुंबांना प्रत्येकी 14 प्रकारची फळझाडे वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ रोटरीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ग्रामीण भागातील लोकांच्या आहारात फळांचा समावेश वाढावा तसेच वृक्षसंवर्धन च्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा व रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 31 31 च्या पर्यावरण कमिटीच्या प्रमुख डॉ. मीना बोराटे यांनी केले.
वरकुटे परिसरातील एक हजार कुटुंबांना आंबा, नारळ, चिंच, पेरू, सिताफळ, रामफळ, मोसंबी, लिंबू, बोर, कडीपत्ता, कोरफड, जांभूळ , बांबू , चिक्कू अशी एकूण 14 झाडे प्रत्येकी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वरकुटे चे अध्यक्ष तुषार शेंडे यांनी दिली.
यावेळी रोटरीचे सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर शितल शहा, मेंबरशिप डायरेक्टर मंजू फडके, लिटरसी डायरेक्टर शशिकांत शेंडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी वरकुटे चे सचिव शिवाजी शेंडे यांनी आभार मानले. राजेंद्र भोंग, संजय म्हस्के, संजय शेंडे, नानासाहेब बनसुडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
याप्रसंगी हॅप्पी व्हिलेज कमिटीचे डायरेक्टर पंकज पटेल, सहाय्यक गव्हर्नर अभय जबडे, उमेश नाईक, झोनल डायरेक्टर ज्ञानदेव डोंबाळे, जया दापोडीकर, शोभा नवले, रूपा पिंगळे, रमेश कुमार गुप्ता, सुजित दोशी, वरकुटे चे माजी सरपंच शिवाजी यादव, बापुराव शेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.










