बारामती : दैनंदिन रुग्णसेवा आणि व्यावसायिक धावपळीत व्यस्त असलेल्या डॉक्टरांनी क्रीडाक्षेत्रातही आपला उत्साह दाखवत बॅडमिंटनच्या मैदानावर जोरदार हजेरी लावली. निमा बारामती आणि आयडीए बारामती-फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय सर्व पॅथी डॉक्टर्स बॅडमिंटन स्पर्धेला राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या प्रारंभी डॉ. राजे, डॉ. लोंढे, डॉ. शहा आणि डॉ. पुरंदरे यांच्या उपस्थितीत श्री धन्वंतरी पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून डॉक्टरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. सहभागी डॉक्टरांनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत विविध सामन्यांमध्ये कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.
दैनंदिन व्यावसायिक जबाबदाऱ्या, रुग्णसेवा आणि व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्यासाठी तसेच विरंगुळ्यासाठी क्रीडेला प्राधान्य दिल्याचे या स्पर्धेतून दिसून आले. अशा उपक्रमांमुळे डॉक्टरांमध्ये तंदुरुस्ती, उत्साह आणि परस्पर स्नेह वाढण्यास मदत होते, असे निमा बारामतीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती आनंद यांनी सांगितले. त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व डॉक्टरांचे कौतुक केले.
IDA बारामती-फलटणच्या अध्यक्षा डॉ. सोनिया शहा यांनी उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले. राज्याच्या विविध भागांतून डॉक्टर एकत्र आल्याने स्पर्धेच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केल्याबद्दल निमा बारामतीचे खजिनदार डॉ. विष्णू घोलप आणि त्यांच्या बॅडमिंटन टीमचे सहभागी डॉक्टरांनी कौतुक केले. बारामती शहरातील क्रीडा सुविधा, शहराचा होत असलेला विकास आणि पाहुणचाराचेही डॉक्टरांनी विशेष कौतुक केले.
या स्पर्धेमुळे डॉक्टरांना व्यावसायिक जीवनातील ताणतणावातून काही काळ विरंगुळा मिळण्याबरोबरच क्रीडा, मैत्री आणि निरोगी जीवनशैलीचा अनुभव घेता आला. विविध गटांतील विजेत्या आणि उपविजेत्या डॉक्टरांचा आयोजकांच्या वतीने गौरव करण्यात आला.
स्पर्धेतील विजेते व उपविजेते – पुरुष एकेरी – विजेता : डॉ. ओंकार दगडे, पुणे. उपविजेता : डॉ. विष्णू घोलप, बारामती
पुरुष दुहेरी : विजेते : डॉ. ओंकार दगडे व डॉ. भूषण जगताप, पुणे. उपविजेते : डॉ. तुषार गदादे व डॉ. विष्णू घोलप, बारामती. ४५ वर्षांवरील पुरुष एकेरी
विजेता : डॉ. प्रशांत कोथळकर, धाराशिव
उपविजेता : डॉ. राहुल पाटील, पुणे. ४५ वर्षांवरील पुरुष दुहेरी विजेते : डॉ. जितेंद्र आटोळे व डॉ. संताजी शेळके, बारामती. उपविजेते : डॉ. प्रशांत कोथळकर व डॉ. मर्दा, धाराशिव
महिला एकेरी – विजेती : डॉ. अपूर्वा गांधी, सोलापूर
उपविजेती : डॉ. ऐश्वर्या मोहिते, पुणे. महिला दुहेरी
विजेत्या : डॉ. ऐश्वर्या मोहिते, पुणे व डॉ. रमा कळंत्री, अहिल्यानगर. उपविजेत्या : डॉ. हेमलता बर्गे व डॉ. अपूर्वा गांधी, सोलापूर. मिश्र दुहेरी विजेते : डॉ. ओंकार दगडे व डॉ. ऐश्वर्या मोहिते, पुणे. उपविजेते : डॉ. सिकची व डॉ. रमा कळंत्री, अहिल्यानगर
स्पर्धेतील सर्व विजेत्या व उपविजेत्या डॉक्टरांचे निमा बारामती आणि IDA बारामती-फलटण यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.











