डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर शहरातील शहा परिवाराने सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपत गेल्या चार दशकांहून अधिक काळ तालुक्यातील विविध शाळांमधील हुशार, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. यंदा हा उपक्रम शहा परिवारातील दिवंगत गोकुळदास शहा यांच्या स्मरणार्थ राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचा गणवेश, शिक्षणातील समतेचे प्रतीक हा विचार केंद्रस्थानी ठेवत वडापुरी येथील श्रीनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मुकुंद शहा आणि अंगद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत गणवेशांचे वितरण करण्यात आले.
शिक्षणात समानतेची भावना रुजावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, या उद्देशाने शहा परिवाराने ही सेवापरंपरा अखंडपणे जपली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यामागे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गेल्या वर्षी इंदापूर परिसरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले होते. स्वातंत्र्यसैनिक नारायणदास शहा, गोकुळदास शहा आणि सुरेशदास शहा यांनी या सेवाकार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर मुकुंद शहा आणि भरत शहा यांनी ही परंपरा पुढे नेली. आता अंगद शहा यांच्या रूपाने शहा परिवाराची तिसरी पिढीही या समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभागी झाली असून, गेल्या चाळीस वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.
यंदा दादासाहेब पाटील विद्यालय (कांदलगाव), राधिका विद्यालय (इंदापूर), शिवाजी विद्यालय (अवसरी), श्रीनाथ विद्यालय (वडापुरी), मूक-बधिर व मतिमंद शाळा (इंदापूर), सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय (इंदापूर), तरंगवाडी विद्यालय, आश्रम शाळा (इंदापूर) तसेच कळाशी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. याशिवाय काही गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठीही आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्य विश्वस्त मुकुंद शहा म्हणाले, विद्यार्थ्यांचे स्वप्न मोठे असावे, अडथळे नव्हे, हीच शहा परिवाराच्या सेवाकार्याची प्रेरणा असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याचा हा प्रयत्न भविष्यातही अविरत सुरू राहणार आहे.











