वडगाव निंबाळकर : मुढाळे येथील पेट्रोल पंपावरून चोरीला गेलेल्या हायवा डंपर चोरीप्रकरणाचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि तब्बल २०० ते २५० किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी चोरीला गेलेला डंपर हस्तगत केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी मुढाळे येथील पेट्रोल पंपावर उभा असलेला हायवा डंपर अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी २३ जुलै रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान पोलिसांनी मार्गावरील सुमारे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी तब्बल २०० ते २५० किलोमीटरपर्यंत पाठलाग करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात छापा टाकला. या कारवाईत चोरीला गेलेला हायवा डंपर जप्त करण्यात आला आणि दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, आरोपींपैकी एकाने यापूर्वी फिर्यादीच्या भावाच्या डंपरवर चालक म्हणून काम केले होते. या जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी पेट्रोल पंपावर उभा असलेला डंपर चोरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.











