मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियातून उपरोधिक टीका केली आहे. त्यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर झुरळ मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रेच्या चित्रासह एक व्यंगात्मक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरण्यात आले असून, “झुरळांनी बेगॉनला हरवलं!” अशी उपरोधिक टिप्पणी करण्यात आली आहे. ही पोस्ट काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.
यापूर्वीही देशपांडे यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका केली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांनी, “हुकूमशाहीला झुकवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याची मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला होता.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मोर्चाची घोषणा केली होती. राजीनाम्यानंतर या आंदोलनाचे स्वरूप बदलले असून, विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आज मुंबईत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आंदोलनात परिधान करणार असलेल्या टी-शर्टचीही चर्चा सुरू आहे. या टी-शर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्र आणि त्यावर लिहिलेल्या मजकुरामुळे राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीकेची धार अधिक तीव्र झाली असून, सोशल मीडियावरील पोस्ट आणि प्रतिक्रिया यांमुळे राजकीय संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.











