माळेगाव : महान्यूज लाईव्ह
माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अधिव्याख्याता पुरुषोत्तम पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
श्री पवार यांनी ‘इन्वेस्टीगेशन्स ऑन मेकॅनिकल अँड ट्रायबॉलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एडिटीवली मॅन्युफॅक्चर्रड SS316L इप्लांट थ्रू ऑप्टीमायझेशन ऑफ डी एम एल एस पॅरामीटर्स’ या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. तसेच प्राध्यापक पवार यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित एकूण सात शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित केले.
त्यांच्या संशोधनाशी निगडित एक पुस्तक प्रकाशित केले व एक पेटंट रजिस्टर केले आहे. या संशोधन कार्यात त्यांना सिंहगड कॉलेज कोर्टी पंढरपूर येथील डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग भविष्यात उत्पादन क्षेत्रात आणि प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. प्रा. पवार यांना गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षा, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त अॅड. राजेंद्र काटे, धन्यकुमार जगताप, विराज खलाटे, प्रवीण पोंदकुले, रोहन देवकाते, डॉ. मोहन नेवसे, डॉ. निलेश नलवडे, गणपत देवकाते,आशा जराड, संस्थेचे विश्वस्त सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, प्राचार्य डॉ. संदीप शहा यांनी अभिनंदन केले.











