माळेगांव : महान्यूज लाईव्ह
राज्यातील अग्रगण्य सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड कामगार आणि वाहतूकदारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कारखान्याच्या वतीने दरवर्षी ऊसतोड कामगारांसाठी विमा संरक्षण योजना राबविली जाते.त्यानुसार कारखाना दरवर्षी गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे नियमित रक्कम जमा करीत असतो. या योजनेत कामगारांच्या कल्याणासाठी नियमितपणे निधी जमा केला जात असला, तरी काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे अनेक पात्र ऊस तोड कामगार या लाभापासून वंचित राहत होते.
मात्र, दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांच्या प्रेरणेने तसेच कारखान्याच्या चेअरमन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे यंदा ६२ ऊसतोड कामगार व बैलगाडी मालकाना विमा योजने अंतर्गत लाभ मंजूर झालेला आहे.या ६२ विमा धारकांना कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या लाभार्थ्यांना मिळून एकूण ४८ लाख रुपयांचे विमा दावे मंजूर झाले असून संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ ऊसतोड कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रत्येकी ५ लाख रुपयांचा विमा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे या कुटुंबांना कठीण प्रसंगी मोठा दिलासा मिळणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले. या निर्णयाबद्दल ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि त्यांच्या संघटनांनी दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत. कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी कारखाना प्रशासन पुढील काळातही अशाच लोकाभिमुख व कल्याणकारी योजना राबवत राहील,असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.










