अजितदादांचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने
मुंबई, दि. ९ जुलै : इंदापूर तालुक्यातील जंक्शन-वालचंदनगर एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील सुमारे १,००० एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर जमीन हस्तांतरण प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बैठकीत महसूल विभाग, एमआयडीसी, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जमीन हस्तांतरणाशी संबंधित प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, जंक्शन एमआयडीसीच्या विस्तारामुळे इंदापूर परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून भविष्यातील गुंतवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि तालुक्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.
यावेळी मंत्री भरणे यांनी सांगितले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेत जंक्शन एमआयडीसी मंजूर केली होती. आता त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे त्यांनी आभार मानले.
या बैठकीला वसंत मोहोळकर, विष्णू माने, दत्तात्रय फडतरे, हर्षवर्धन गायकवाड, उद्धव माने, अभिषेक माने यांच्यासह महसूल विभागाचे सचिव, उपसचिव, मंत्रालयीन अधिकारी, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.











