बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या साहित्यिक प्रतिभेचा ठसा उमटवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु. अनुष्का कन्हेरकर आणि कु. रितिका धुमाळ यांच्या हिंदी कवितांची भारत सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाअंतर्गत कार्यालय महानियंत्रक (अभिकल्प व व्यापार चिन्ह) यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘अटल बाल हिंदी कविता संग्रह – २०२५’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय काव्यसंग्रहासाठी निवड झाली आहे.
युवा पिढीमध्ये हिंदी भाषा आणि साहित्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देणे तसेच बौद्धिक संपदा हक्क आणि कॉपीराइट संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातून तब्बल ६७५ मौलिक हिंदी कविता प्राप्त झाल्या होत्या.
त्यापैकी उत्कृष्ट १०० बालकवींच्या रचनांची निवड करून त्यांचा ‘अटल बाल हिंदी कविता संग्रह – २०२५’मध्ये समावेश करण्यात आला. या मानाच्या यादीत विद्या प्रतिष्ठानच्या दोन्ही विद्यार्थिनींनी स्थान मिळवत बारामतीसह शाळेचा गौरव वाढविला आहे.
या यशामागे शाळेच्या हिंदी विभागप्रमुख सौ. मंदा भोसले, सौ. शीतल धुमाळ आणि मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार तसेच संस्थेच्या इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत भावी साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा सन्मान विद्यार्थिनींच्या लेखनप्रतिभेची पावती ठरला असून, त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही सर्जनशील लेखनाकडे प्रेरणा मिळणार आहे. विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.











