मुंबई : राज्यातील दूध भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर २५ कलमी कठोर अनुपालन नियमावली लागू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार दूध संकलनापासून ते ग्राहकांपर्यंत दूध पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर आता अधिक कडक देखरेख ठेवली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
दूध संकलन, शीतकरण, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि किरकोळ विक्री या प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षा व गुणवत्ता मानकांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे दूध व्यवसायाशी संबंधित प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
राज्यातील तपासण्या आणि दूध नमुन्यांच्या चाचण्यांमध्ये आढळून आलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली लागू करण्यात आली आहे. राज्यभर एकसमान निकषांनुसार कामकाज होण्यासाठी आणि भेसळीच्या प्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुट्ट्या दुधाच्या विक्रीसाठीही स्वतंत्र अटी घालण्यात आल्या आहेत. अशा विक्रेत्यांना दुधाचा स्रोत, स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करणे बंधनकारक असेल. ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार दूध उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर राहणार आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, या मोहिमेचा उद्देश केवळ दूध भेसळ रोखणे एवढाच नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण, ग्राहकांचा विश्वास दृढ करणे, प्रामाणिक दूध व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि राज्यातील अन्न सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे हाही आहे.
महाराष्ट्र हा देशातील प्रमुख दुग्ध उत्पादक राज्यांपैकी एक असून, दररोज मोठ्या प्रमाणावर दूध संकलन व विक्री केली जाते. बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांच्या आरोग्याशी दुधाचा थेट संबंध असल्याने त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत. या नव्या नियमावलीमुळे दूध भेसळीवर प्रभावी नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










