विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून शनिवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने त्याआधीच सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.
शनिवारी (दि. ४ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका व शहर पातळीवरील महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता कसबा, बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून जय पवार उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयावर चर्चा होणार आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्य, समन्वयक, युवक व महिला आघाडीचे कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून शनिवारी ते प्रमुख ओबीसी नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीसाठी स्वतंत्र रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
याचबरोबर काँग्रेस पक्षानेही बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमध्ये उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत माहिती दिली असून बारामतीतून सहा इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे दाखल झाले आहेत. शनिवारी या इच्छुक उमेदवारांशी वरिष्ठ नेते संवाद साधणार असल्याची माहिती आहे. एकूणच, सोमवारी होणाऱ्या उमेदवारी अर्जाच्या पार्श्वभूमीवर शनिवारचा दिवस बारामतीच्या राजकारणात निर्णायक ठरणार असून सर्व पक्षांची जोरदार हालचाल पाहायला मिळणार आहे.











