रमजान मुल्ला, सांगली (919372540985)
माझी आई सांगते.. की मी लहानपणी झोपेत खूप दात खायचो. त्यामुळे बऱ्याचदा मला झोपेतच कानाखाली मिळायची. मग उठून माझी जोरदार रडारड सुरू…
माझे अब्बा हे पट्टीचे ड्रायव्हर. ट्रॅव्हल्स चालवत लांब लांब प्रवास करायचे. कधी कधी दिवस रात्र ड्रायव्हिंग करून ते कंटाळून घरी येऊन झोपलेले असायचे. अन् अशा अवेळी होणारी माझी रडारड त्यांनाही असह्य व्हायची. मग त्यांनी रागात दिलेले टोले खाऊन भीतीने मी गप्प व्हायचो.
आमच्या घरी त्यावेळी कदम आज्जीचं येणं जाणं होतं. त्यावेळी वयाची शंभरी गाठत आलेली कदम आज्जी आपल्या दोन्ही नाकपुडीत तपकीर भरून सदैव ठिसकारत असायची. माझ्या “झोपेत दात खाण्याची गोष्ट” तिला बोलण्याच्या ओघात समजली. मग त्यावर तिनं उपाय सांगितला.
आमच्या गावात हनुमानाचे सुंदर असं एक मंदिर आहे. शनिवारी तिथं जाऊन हरभरा डाळीसोबत गुळ,चणे फुटाणे ठेवून हात जोडून प्रार्थना करायची… आणि प्रसाद म्हणून तेच चणे व हरभरा डाळ, गुळ मला खायला द्यायचा.. हा सोपा उपाय कदमांच्या आज्जी ने आमच्या घरी सांगितला.
माझ्या आईने मग मला शनिवारी हनुमान मंदिरात नेले. कदम आज्जीने सांगितले तसे केले. आईने मलाही हात जोडून प्रार्थना करायला लावली. माझे झोपेत दात खाणे बंद होऊ दे.. बंद होऊ दे.. बंद होऊ दे…असे तीन वेळा मला देवासमोर बोलायला लावले. अन् समोर ठेवलेला हरभरा डाळीचा,गुळाचा, फुटाण्याचा प्रसाद खायला लावला. अन् आम्ही देवळाच्या बाहेर पडलो. का कोणास ठाऊक….. त्या दिवसानंतर मी कधीच झोपेत दात खाल्ले नाहीत. स्वप्नात दात खाण्याचा प्रसंग आला तरी मला हनुमान आठवायचा.
कदाचित आजच्या भयावह काळातल्या कलुशीत वातावरणाला ही गोष्ट आज साजेशी होणारही नाही. पण हे मी लहानपणी अनुभवलंय. तेंव्हा “कदम आज्जी” सारखे धर्माच्या पलीकडे जाऊन निखळ विचार करणारे लोक होते.. त्यांच्या म्हणून अशा काही श्रद्धा, अंधश्रद्धा, रीती भाती होत्या..त्या समाजातल्या प्रत्येकाने हळुवार जपल्याही होत्या..
त्या सधन काळाची ही गोष्ट आजच्या कलुशीत काळात जाणूनबुजून कालबाह्य केली गेलीय याचं वाईट वाटतंय. ज्याला जसे हवे तसे निर्व्याज जगू दिले तर… किती चांगलं होईल ना..! असो… हनुमान जयंती आहे. यानिमित्ताने ही गोष्ट आठवली. म्हणून तुम्हाला सांगावीशी वाटली हो..माझ्या सर्व बांधवांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. (लेखक प्रसिद्ध कवी आहेत.)











