डॉ. महेश घोळवे, महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्ध रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने ४८ धावांनी सहज विजय मिळवत आपणच खरे “किंग्ज” आहोत हे दाखवून दिले. सलामीवीर रोहित शर्मा , कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या च्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईच्या संघाने १९१ धावांचा डोंगर उभा केला. याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या १४३ धावा करू शकला. चहर, बुमराह आणि पॅटिन्सन या त्रिकूटाने प्रत्येकी २-२ बळी घेत मुंबई इंडियन चा विजय साकारला. तुफान फटकेबाजी करणाऱ्या कायरन पोलार्डला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन मध्ये रोहित म्हणाला की, “बोल्ट आणि पॅटिन्सन हे दोघेही उत्तम गोलंदाज आहेत. त्यांच्यासोबत मी पूर्वी फारसा खेळलो नव्हतो, त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं हे माझ्यापुढे आव्हान होतं. मात्र आता त्यांना मला काय हवं आहे ते नक्की समजलं आहे त्यामुळे आता तेच प्लॅन तयार करतात आणि मला समजावून सांगतात. आता आमची चांगली मैत्री झाली आहे. IPL मध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडणे खूपच आनंददायी आहे, पण माझं लक्ष्य सामना जिंकणं हेच होतं आणि कायम असेल”,
आजच्या सामन्यानंतर पुन्हा मुंबई गुणतालिकेत मध्ये अव्वल क्रमांकावर झेपावली आहे. मुंबई ची पुढची मॅच हैदराबाद बरोबर रविवारी होणार आहे तर आज चेन्नई सुपर किंग बरोबर हैदराबादचा मुकाबला होणार आहे.











