फलटण : महान्यूज लाईव्ह
फलटण तालुक्यातील काळज येथील दहा महिन्याचा चिमुकला ओम भगत याचा खून करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या खऱ्या, पण त्यामागचे कारण ऐकल्यानंतर साऱ्यांचेच डोके चक्रावून जाईल आणि संतापाचा भडका उडेल.. लोणंद पोलिसांनी पकडलेल्या नराधमाने ओमची आई एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने त्या निष्पाप बालकाचा खून त्या नराधमाने केल्याचे तपासात उघड झाले आहे.
काळज (ता. फलटण) येथील ओम भगत याचे मंगळवारी अपहरण झाले होते. त्याच्या अपहरणाने संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे, नगर जिल्ह्यातही मोठी खळबळ उडाली होती. त्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत शोधपथके तपास करीत होती. मात्र त्या बाळाचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने जनमाणसात संतापाची भावना होती. या घटनेतून जनक्षोभ होऊ शकतो हे लक्षात घेत लोणंद पोलिसांनी जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा गुन्हे शोध पथकाचे सर्जेराव पाटील, लोणंदचे पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या पथकाने माहिती काढून संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचे समोर आले असले तरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.











