घनश्याम केळकर, बारामती
ही गोष्ट एका यशस्वी युट्युबरची आहे, एका यशस्वी उद्योजिकेची आहे. वयाच्या ७० व्या नवा उद्योग सुरु करण्याची तयारी दाखविणाऱ्या एका आजींची आहे. पारंपारिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचीही आहे. पण या सर्वांपेक्षा एका आजी आणि नातवाच्या जोडगोळीची आहे, जे नातं आज दुर्मिळ होत चाललेले आहे. भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या मानकरी सुमन धामणेआजी या स्टोरीच्या हिरॉईन असल्या तरी दिग्दर्शकाच्या भुमिकेत त्यांचा नातू यश आहे.
सुमनआजी अहिल्यानगरजळच्या सुपा गावच्या. घरी मोठ खटल. त्यांना चार बहिणी. आजी सगळ्यात धाकट्या. काळ असा की मुलींना शाळेत पाठवलेच पाहिजे असे नाही. मग सुमनआजीही कधीच शाळेत गेल्या नाहीत. मग कधीतरी सही करण्यापुरती अक्षरओळख झाली, ती तेवढीच. मग घरच्या स्वयंपाकघरात लुडबुड. पण मोठ्या बहिणी काही करू द्यायच्या नाही. पण जमेल तसे त्यांच्या मधेमधे करायचे. सांगतील ते करायचे. पण लग्न झाले आणि त्या जवळच्याच सारोळा कासारला धामणेंच्या घरात आल्या. तिथे सासुबाईंच्या नेतृत्वाखाली स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी शिकल्या.
त्यांचे पती पोलिस अधिकारी होते. त्यांच्या दोन चार वर्षाला बदल्या व्हायच्या. त्यांच्या बरोबरीने त्या जवळपास सगळ्या नगर जिल्ह्यात फिरल्या. तिथेही नवनवीन पदार्थ शिकून घ्यायची आवड. त्यासाठी जवळपासच्या बायकांशी मैत्री करायची. त्यांना जे चांगले जमते ते शिकून घ्यायचे. हे सुरूच राहिले. त्यांना एकच मुलगी. त्यांनी पतीला सांगितले, मुलासाठी दुसरे लग्न करा. त्यावर धामणेसाहेब म्हणाले, नेहरूंनापण एकच मुलगी आहे ती म्हणजे इंदिरा. ती एकटीच सगळ्यांना भारी ठरली आहे. मुलाचा हट्ट कशाला पाहिजे.
पुढे मुलगी मोठी झाली. तिचे लग्न झाले. नातू आला. सुमनआजींच्या ६७ किंवा ६८ व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात कोरोना आला. या कोरोनाने सगळ्या जगाला घरात बंद करून ठेवले. त्यावेळी त्यांचा नातू यशने सांगितले, आजी, तु स्वयंपाक कर, मी शुटींग करतो. आजींना सोशल मिडिया म्हणजे काय हेदेखील माहिती नव्हते. पण यशने त्यांना या तंत्रज्ञानाची माहिती दिली. मग हळूहळू एकएक रेसीपी शुट होऊ लागली. यु ट्युबवर या सुमनआजींना आणि त्यांच्या रेसिपींना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला.
पुढे कोरोना संपला पण आपली आजी हे यु ट्युब चॅनेल मात्र सुरुच राहिले. यात मग पारंपारिक पदार्थ आले. स्वयंपाकघरातील टीप्स आल्या. स्वच्छतेच्या अनेक गोष्टी आल्या. येवढेच नाही तर तर कुणी पिझ्झा कसा करायचा सांगा अशी कॉमेंट केली. तर आजींनी पिझ्झाही शिकून घेतला आणि त्यांच्या हटके स्टाईलने तोदेखील बनवून दाखवला. आता त्या स्वत:च्या मनाने काही करत नाहीत. जशा त्यांना कॉमेंट येतात, त्याप्रमाणे त्या रेसीपी शूट करतात.
आजींची त्यांच्या गावरान बाजातील अस्सल मराठी, नववारीचा पेहराव, त्या सांगत असलेल्या स्वयंपाकातील पारंपारिक पद्धती यामुळे या चॅनेलला आज १० लाख सबस्क्रायबर्स मिळाले आहे. यानंतर अनेकांनी मसाल्याची विचारणा केली. त्यामुळे घरगुती मसाले बनविण्याचा व्यवसायही आता सुमनआजी आणि यशने सुरु केला आहे.
आज सुमनआजींची मोठी फॅन फॉलोईंग आहे. लाखांनी महिला त्यांचे यु ट्यूब चॅनेल पहात असतात. त्यावर हजारोंनी कॉमेंट पडतात. पण आजही सुमनआजींना मोबाईल आणि सोशल मिडियाचा नाद नाही. त्या आपल्या कामात दंग असतात. आसपासच्या लोकांशी प्रत्यक्ष बोलण्यात त्यांना मोबाईलवरच्या भेटीपेक्षा जास्त आनंद मिळतो. त्यांचा नातू त्यांचे हे कौतूक त्यांना सांगत असतो आणि कदाचित मोबाईलवर वाचण्यापेक्षा नातवाच्या तोंडून हे सगळे ऐकण्यात त्यांना जास्त आनंद मिळतो.
तर या आहेत भीमपुत्र आयडॉल २००२५ च्या मानकरी सुमनआजी धामणे. भीमपुत्र आयडॉल २०२५ चा हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील संविधान विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
(भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या सन्मानमुर्तींची बारामतीकरांशी अधिक चांगली ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, अनेक प्रकल्प बारामतीत आकारात यावेत हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. यासाठी या सन्मानमुर्तींसोबत गटचर्चा किंवा संस्थेला भेट देण्याबाबतचे नियोजन आम्ही करत आहोत. आपणास या गटचर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल किंवा आपल्या संस्थेला भेट द्यायची असेल तर ९८८१०९८१३८ – घनश्याम केळकर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.)











