उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुढारी कम ठेकेदारांची कानउघडणी
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,मलिदा गॅंगने मला तर नको नको केलं आहे तरी त्यांना हौस आहेच.मी शंभरदा सांगितलं, एक तर पुढारपण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर बना.तुम्ही पुढारी बनणार,माझ्याकडून कामे घेणार आणि कामाचा दर्जा नाही राहिला तर मी पुन्हा अडचणीत येणार.लोकं म्हणतील अजित पवारांना हे दिसत नाही का? या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाऱ्यांसह ठेकेदारांची कानउघडणी केली.
पुढे बोलताना पवार म्हणाले,
माळेगाव कारखान्याच्या काही संचालकांबद्दल सभासदांकडून तक्रार येत आहेत की नीट बोलत नाहीत, नीट न बोलायला काय झालं? मी माझा १९९९ पासून किती स्वभाव बदलला आहे.माळेगाव कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात संचालक लोकांच्या बाबत काही सूचना असतील तर कळवा कोणाला संधी द्यायची कोणाला रिपीट करायचं ते ठरवू.आजपर्यंत जशी साथ देत आला आहात तशी उद्याच्या काळात ही द्यावी.असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
माळेगावचे नेतृत्व मी करत आहे. सोमेश्वर चे नेतृत्व मी करत आहे.श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची शपथ घेऊन सांगतो कुठेही माळेगावच्या सभासदांना भावामध्ये अंतर पडू देणार नाही.केंद्राच्या ज्या योजना असतील त्यापासून वंचित ठेवणार नाही. माझी आणि मोदी साहेबांची आणि अमित शहांची ओळख आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल.माळेगांवच इलेक्शन लागेल तेव्हा मी तुमच्या समोर येईल.असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.











