विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे व कधीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे.आज बारामती मध्ये शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले,
कारखान्याच्या ज्या काही निवडणुका असतात. तो कुठलाही पक्ष लढवत नसतो. शेतकरी असतात ते त्या निवडणुका लढवत असतात.माळेगाव कारखाना हा पवार साहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो.
पवार साहेब त्या कारखान्याचे सभासद आहेत. पवार साहेबांनी जेवढे या कारखान्यासाठी काम केलं आहे. आतापर्यंत तेवढं कोणीही त्या कारखान्यासाठी काम केलं नाही. कारखान्याचा डीसलरी प्रकल्प असेल किंवा प्राज ही एवढी मोठी कंपनी झाली असेल, त्या कंपनीला एवढी मोठी संधी आपल्या माळेगाव कारखान्यामध्ये पवार साहेबांनी दिली. कोजन असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सगळं त्यांच्या मार्गदर्शनातून तिथं झालेलं आहे. असं युगेंद्र पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, आज कारखान्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांमध्ये जर स्वाभिमानी शेतकरी, स्वाभिमानी सभासद जर कारखान्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील तर आम्ही आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे लावू. कारखान्याच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्या पुढे जातील की वेळेवर होणार आहेत हे माहिती नाही. ज्या दिवशी तारीख फायनल होईल त्या दिवशी आम्ही आमची भूमिका निश्चित करू.
आपल्या उपस्थितीत सभासदांची आढावा बैठक झाली असा प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले, फक्त सभासद नाही, तर आपले सगळे कार्यकर्ते होते. सगळे सभासदच होते असं नाही, पण सगळ्यांची भावना काय आहे हे समजून घेण्यासाठी काल आम्ही ही बैठक ठेवली होती. सगळ्यांचं म्हणणं होतं की, आपण ताकद लावली पाहिजे. फक्त कारखान्यासाठी नाही, तर इथून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका येतील त्यासाठी ही ताकद लावण्याची ठरले. शेवटी आपला पक्ष आहे. पवार साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. कार्यकर्त्यांना ताकद दिलीच पाहिजे आणि शंभर टक्के आम्ही देणार आहे.असेही युगेंद्र पवार म्हणाले.











