डॉ. संदेश शहा, इंदापूर
गोवंशाची कत्तल करुन दोन लाख रुपये किमतीचे एक हजार किलो गोमांस घेवून जाणा-या पाच जणांवर गुन्हा दाखल करुन इंदापूर पोलीसांनी त्यांच्याकडील गोमांस, गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने व इतर सुमारे असा एकूण ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील राजवडी गावच्या हद्दीत गायरान जागेत ही कारवाई करण्यात आली असून आज पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरीद मोहमद शेख ( वय २७ वर्षे रा. सरस्वतीनगर, इंदापूर), वासिम मनेर कुरेशी ( वय २७ वर्षे रा.कुरेशी गल्ली इंदापूर ), रेहान बशीर कुरेशी ( वय २४ वर्षे रा. कासारपटटा इंदापूर ), सलीम रज्जाक बेपारी ( वय ३६ वर्षे ), मुस्तफा शकील कुरेशी ( वय २४ वर्षे दोघे रा. श्रीराम चौक इंदापूर ) अशी आरोपींची नावे असून या प्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश डेरे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी त्यांच्याकडून २ लाख रुपये किमतीचे १ हजार किलो गोमांस, प्रत्येकी १ हजार रुपये किमतीची ५ जर्सी वासरे, दोनशे रुपयांचा वजनकाटा, अडीच लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा चार चाकी टेम्पो ( क्र.एम.एच.१२ जे एफ ७३०४ ), ३ लाख रुपयांची महेंद्र कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी ( क्र. एम एच ४५ 45 ए ७९०३ ) असा एकूण ७ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोग्य विभागाचा कोणताही रीतसर परवाना नसताना, स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी संगनमत करुन जनावरांची कत्तल करुन गोमांस घेवून जात असताना आरोपी सापडले. जनावरांच्या चारापाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना वाहनात दाटीवाटीने कोंबून वाहतुक केली, या आरोपावरुन इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५८ /२०२५ बी.एन.एस. २०२३चे कलम ३२५, ३ (५) सह प्राणी छळ अधिनियम १९६० चे कालम ५ ए, ५ बी, महाराष्ट्र पशु संरक्षण १९७६ चे कलम ९,११ अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.











