विक्रम वरे, बारामती
बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता उद्या होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामतीतील शारदा प्रांगणात संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहेत. १९ डिसेंबर रोजी महावीर भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, युगेंद्र पवार हे जाहीर सभा घेणार आहेत तर दुसरीकडे गुरूवारी १८ डिसेंबर रोजी बसपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरी यांच्या प्रचारासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके पदयात्रा काढणार असून जाहीर सभा घेणार आहेत.
एकंदरीत गुरुवारी बारामतीत निवडणुकीची रणथुमाळी शिगेला पोहोचणार आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचाराची सांगता सभा असणार आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकरांना काय आवाहन करतात, यावर बारामतीतील मतदानाची टक्केवारी आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी यावरील प्रत्यक्ष परिणाम अवलंबून असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मात्र १९ डिसेंबर रोजी शहरातील महावीर भवन येथे सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रचाराची अंतिम सभा घेणार आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
या निवडणुकीत लक्षवेधी ठरलेले बहुजन समाज पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरी यांच्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उद्या गुरुवारी मैदानात उतरणार आहेत. बारामतीतील बस स्थानकासमोरील स्वीट होम च्या जागेत त्यांची जाहीर सभा होणार असून, त्या अगोदर ते शहरातील विविध ठिकाणी काळुराम चौधरी यांच्यासाठी पदयात्रा काढणार आहेत.
एकंदरीतच गेल्या 18-20 दिवसात प्रभावी न ठरलेले निवडणुकीचे वातावरण उद्या एका दिवसात दिसणार असून, उद्या एका दिवसात बारामती शहरातील नगरपरिषद निवडणुकीसाठी वातावरण ढवळून निघणार आहे.











