बारामती : महान्यूज लाईव्ह
रक्ताच्या नात्यांवर लोभाचे सावट पडल्यास किती भयंकर परिणाम होऊ शकतात याचे उदाहरण ठरलेल्या बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणात बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने आज महत्त्वाचा निर्णय देत तिघा आरोपींना आजीवन कारावास व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तदर्थ न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला.
या खटल्यामध्ये विशाल सोपान वत्रे (मसनरवाडी, ता. दौंड), जयदीप जयराम चव्हाण (येडेवाडी, लिंगाळी, ता. दौंड), केरबा नारायण मेरगळ (मेरगळमळा, मसनरवाडी, ता. दौंड) या तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
मृत रमेश तुकाराम बाराते आणि त्यांची कन्या शीतल रमेश बाराते (एमबीबीएस विद्यार्थीनी) यांच्या हत्येमागे आरोपी विशाल वत्रे हा मुख्य सूत्रधार होता. वत्रे हा मृत रमेश बाराते यांचा जावई होता. त्याचे बाराते यांची दुसरी कन्या, म्हणजेच शीतल, हिच्याशी विवाह करण्याचे अस्वाभाविक आकर्षण होते. याशिवाय बाबुर्डी येथील १६ एकर जमीन स्वतःच्या नावे मिळावी हा त्याचा प्रमुख हेतू होता.
बाराते कुटुंबाने त्याचा हा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. या नकाराचा राग वत्रेने मनात घट्ट धरला आणि हत्या करून मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला. सुपारी देऊन आखलेला निर्दयी कट रचला. वत्रेने त्याचे दोन मित्र जयदीप चव्हाण व केरबा मेरगळ यांना यात सामील केले. दोघांना पैशांची लालच दाखवत बाप–लेकीची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली.
यासाठी हत्या होणार असलेल्या जागेची रेकी, पीडितांना कुठे थांबवायचे, कसे हल्ला करायचा याची पूर्वतयारी योजनेपूर्वक करण्यात आली. २२ मार्च २०१६ रोजी वत्रे याने रमेश बाराते आणि शीतल यांना ‘जेवणासाठी घरी या असा बहाणा करून बोलावले. जेवण आटोपल्यावर दोघे मोटारसायकलवरून परत निघाले आणि हिंगणगाडा परिसरातील ओसाड ठिकाणावर चव्हाण व मेरगळ यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला चढवला.
चव्हाणने दगडाने वार केले. मेरगळने कोयत्याने शीतल व रमेश बाराते यांच्यावर सपासप वार करत दोघांची निर्दयपणे हत्या केली. हत्या झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी मृत रमेश बाराते यांचे पुतणे अमोल जयरात बाराते यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास हाताळला.
तपासात घटनास्थळी मिळालेले रक्ताचे नमुने, मृतदेहाच्या जखमा, आरोपींच्या हालचालींची माहिती, साक्षीदारांचे जबाब, फोन रेकॉर्ड, आरोपींचे गुन्ह्यावेळी उपस्थितीचे पुरावे या सर्वाचा समावेश असलेले भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षाची बाजू अॅड. स्नेहल नाईक यांनी मांडली. त्यांच्या युक्तिवादाला बळकटी देणारे एकूण २० साक्षीदार सादर केले गेले. महत्त्वाच्या साक्षींमध्ये फिर्यादी अमोल बाराते, मृतांचे जवळचे नातेवाईक, आरोपी वत्रेची पत्नी (मृतांची थोरली मुलगी), पंच, तपास अधिकारी यांचे जबाब निर्णायक ठरले.
अॅड. नाईक यांनी खूनासंबंधीची संपूर्ण साखळी पुरावा न्यायालयात सिद्ध केली. आरोपींचा हेतू, पूर्वतयारी, हत्या करण्याची योजना, घटनास्थळावरील पुरावे आणि गुन्ह्यानंतरचे वर्तन यांची सांगड घालत ते दोषी असल्याचे पटवून दिले. न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ३०२ (खून) आणि कलम १२० (ब) (षडयंत्र) अंतर्गत दोषी मानले. त्यामुळे तिघांनाही जन्मठेप (आजीवन कारावास), २५,००० रुपये दंड व दोन्ही कलमान्वये स्वतंत्र शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षाला पैरवी अधिकारी गोरख कसपटे, तसेच अंमलदार विठ्ठल वारगड आणि वेनुनाद ढोपरे यांनी महत्त्वाची मदत केली.











