विक्रम वरे, बारामती
बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अब्बास कायमखानी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
हा प्रवेश बारामतीच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात असून, नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अब्बास कायमखानी हे शहरातील अल्पसंख्याक समाजात प्रभावशाली नेतृत्व मानले जाते. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
या प्रवेशप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील, बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे, जितेंद्र गुजर, सुरज सातव, बिरजू मांढरे, माधव जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने कार्यरत असून, आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या प्रवेशामुळे बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळ मिळाले आहे.











